मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या पोलीसांच्या नोटिशीला मुंबईतील पाच मशिदींकडून उच्च न्यायालयात आव्हान!

03 Jul 2025 14:06:09

मुंबई(Noise pollution and mosques loudspeaker): मुंबईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याचिकेत म्हटले आहे की, “सर्व नोटिसांमध्ये ध्वनी प्रदूषण उल्लंघनाची तारीख, वेळ अथवा डेसिबल तीव्रतेसंबधित कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. यामुळे संपूर्ण कारवाई ही मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणारी आणि भेदभाव करणारी आहे. त्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्गत आमच्या समानतेच्या अधिकारचे आणि कलम १५ अंतर्गत धर्मावर आधारित भेदभाव न करण्याच्या मूल्याचे उल्लंघन होत आहे.”

या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. त्यात खंडपीठाने महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांना नोटीस बजावून आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.



Powered By Sangraha 9.0