मुंबई : देशभरातील विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने स्वदेशी जागरण मंचने १० ऑगस्ट रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले असून 'विदेशी कंपनियों भारत छोड़ो' कार्यक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमुळे भारतातील किरकोळ व्यापाऱ्यांना आणि स्थानिक बाजारपेठांना होणाऱ्या नुकसानीपासून आणि विदेशी वस्तूंमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी जनतेच्या समर्थनासह हे कार्यक्रम होणार आहेत. याकरीता पश्चिम बंगालमधील हरिगुरु गोपाल चंद्र धाम, पंचगडा येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत वक्त्यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देत भारताच्या आर्थिक आत्मनिर्भरतेची गरज अधोरेखित केली. स्वदेशी जागरण मंचाचे संस्थापक दत्तोपंत बापूराव ठेंगडी यांचे स्वप्न होते की भारतासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे उत्पादन देशातच व्हावे आणि परदेशी अवलंबित्व पूर्णतः संपावे. या कार्यक्रमात “स्वदेशी सुरक्षा आणि स्वावलंबन अभियान” यावरही चर्चा झाली.
स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक डॉ. धनपत राम अग्रवाल यांनी सांगितले की, “१९४७ मध्ये आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले, पण आर्थिक स्वातंत्र्य आजही अपूर्ण आहे. हे फक्त तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करू आणि विदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व संपवू.” स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. धर्मेंद्र दुबे म्हणाले, “विदेशी कंपन्या भारतात व्यापार करत आहेत आणि आपल्या संसाधनांचा वापर करून आपल्यालाच आर्थिक नुकसान पोहोचवत आहेत. चीन व बांगलादेशसारख्या देशांच्या कंपन्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या भारतविरोधी कारवाया चालवत आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण विदेशी वस्तूंना दूर सारून स्वदेशीचा अंगीकार करावा.”