नवी दिल्ली : भारतावर दहशतवादी हल्ला केल्यास केवळ दहशतवादीच नव्हे तर पाकिस्तानसह त्यांचे आकाही आता सुरक्षित नाहीत, हे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सिद्ध केले आहे. त्यामुळे भारत आता आपल्या पद्धतीने दहशतवाद संपवतो हे ‘सिंदूर ते सिंधू’ असा प्रचंड मोठा आवाका असलेल्या सैन्यमोहिमेद्वारे सिद्ध केले असून त्याची दहशत पाकला बसली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंगळवारी केले.
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन महादेव’, भारताचे परराष्ट्र धोरण यावर भाष्य करून काँग्रेसचे वाभाडेही काढले. पंतप्रधान म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षादलांना कारवाई करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. भारतीय सैन्यदलांनी अभुतपूर्व समन्वय आणि सामर्थ्य दाखवून २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला अवघ्या २२ मिनिटात घेतला. पाकच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण तळांवर अचूक हल्ले करून पहलगाम हल्ल्याची आखणी करणाऱ्या आकांना धुळीस मिळवले. भारताच्या अतिशय सामर्थ्यशाली अशा हल्ल्यांपुढे पाक काहीही करू शकला नाही. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकच्या अणूधमकीचीही हवाच निघून गेली आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ले केल्यानंतर दहशतवाद्यांचे आका निर्धास्त असत. मात्र, भारताच्या कारवाईचा ‘सिंदूर ते सिंधू’ असा आवाका बघून दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप लागत नाही. हेच भारताने घालून दिलेले ‘न्यू नॉर्मल’ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगातील एकाही देशाने विरोध केला नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघात १९८ पैकी केवळ ३ देशांनीच पाकच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. त्याचवेळी ब्रिक्स, क्वाड ते रशिया, जर्मनी, फ्रान्ससह जगातील सर्व देशांनी भारतास पाठिंबा दिला. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा मात्र भारतास मिळाला नाही. काँग्रेसने छछोरपणा दाखवून भारतीय सैन्याचे मनोबल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारताने आपले लक्ष्य साध्य झाल्यावर कोणत्याही देशाच्या दबावाशिवाय ऑपरेशन स्थगित केले. त्याविरोधात सीमापारकडून प्रपोगंडा चालविण्यात आला आणि काँग्रेसनेही तोच नॅरेटिव्ह पसरविण्यात आघाडी घेतली. एकीकडे देश आत्मनिर्भर होऊन वेगवान आगेकूच करत असताना काँग्रेस मात्र पाकनिर्भर होत आहे. काँग्रेसवर पाकचे मुद्दे आयात करण्याची वेळ आली असून पाकच्या षडयंत्राच्या प्रवक्तेपणाची भूमिका काँग्रेस पार पाडत असल्याचा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
‘ऑपरेशन महादेव’द्वारे पहलगामच्या हल्लेखोरांनी भारतीय सुरक्षादलांनी ठार केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र, कालपर्यंत पहलगामच्या दहशतवाद्यांचे काय; असा प्रश्न विचारणारे आज मात्र ‘आताच हे ऑपरेशन कसे झाले’ असे प्रश्न विचारत आहेत. देशात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा देशाचे परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांसह देशाच्या व्यवस्थांवर विश्वास नाही. कारण, त्यांचे धोरण सध्या पाकमधून रिमोटकंट्रोलद्वारे ठरवले जाते, असाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला.
सैन्यविरोध ही काँग्रेसची जुनी भूमिका
सैन्यास विरोध करण्याची आणि नकारात्मकता पसरविण्याची काँग्रेसची जुनी भूमिका आहे. सत्तेत असताना काँग्रेस सरकारने कधीही कारगिल विजय दिन साजरा केला नाही, त्या विजयास काँग्रेसने अजुनही स्वीकारलेले नाही. डोकलाम प्रकरणातही भारतीय सैन्य चीनला धडा शिकवत असताना काँग्रेस नेते चीनी राजदूताकडून ब्रिफींग घेत होते, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
आमचा वारसा छत्रपती शिवरायांचा
शांतता हीच भारताची भूमिका आहे. मात्र, शांतता आणि समृद्धीचा मार्ग सामर्थ्यातूनच येतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजेंद्रल चोल, सुहेलदेव ते महाराजा रणजितसिंग यांचे आम्ही वारसादार आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अजुनही सुरूच असून पाकच्या कोणत्याही आगळीकीस भयावह उत्तर देण्यास भारतीय सैन्यदले सज्ज आहेत, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
लांगुलचालनासाठी ‘भगवा दहशतवाद’
मुंबईतील २६/११ हल्ल्यामधील एक दहशतवादी पकडला जाऊन संपूर्ण जगात पाकला रोषाचा सामना करावा लागत होता. मात्र, त्याचवेळी लांगुलचालनासाठी काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ संकल्पना मांडून हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा डाव मांडला होता. त्याचप्रमाणे बाटला हाऊस चकमकीत दहशतवादी मारल्यानंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे सांगण्यात आले होते. दहशतवादाविरोधात जे धोरण गेल्या ११ वर्षांत राबवले, तसे धोरण काँग्रेसने लांगुलचालनामुळे राबवता आले नाही; असे पंतप्रधान म्हणाले.
जागतिक शांततेसाठी भारताची संरक्षण आत्मनिर्भरता महत्त्वाची
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये स्वदेशी शस्त्रे आणि प्रणालींनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकच्या जवळपास हजारभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यास भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच पालापाचोळ्याप्रमाणे उडवून लावले. भारताची संरक्षण उत्पादनातील क्षमता यामुळे सिद्ध झाली असून जगातील संरक्षण बाजारपेठ आता भारतासाठी खुली झाली आहे. सध्याच्या जगाचा विचार करता भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
एका कुटुंबाचा दबाव झुगारू टाका – पंतप्रधानांचे काँग्रेस खासदारांना आवाहन
भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी जगातील विविध देशांमध्ये जाऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारताची भूमिका अतिशय समर्थपणे मांडली. त्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश होता. मात्र, त्यावरून काँग्रेसच्या एका बड्या नेत्यास पोटदुखी सुरू झाली असून त्या सदस्यांना सभागृहात बोलू दिले नसल्याचे समजते. मात्र, एका कुटुंबाच्या दबावाखाली येऊन पाकला क्लीन चीट देण्याचा प्रकार काँग्रेसच्या सदस्यांनी बंद करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.