मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे - चिन्मयी सुमित

29 Jul 2025 11:35:24

important-to-teach-in-mother-tongue-chinmayi-sumit
 
मुंबई : सध्याच्या काळात शिक्षण घेण्याचे बोर्ड बदललं आहे आणि भाषा सुद्धा बदलली आहे पण पालकांनी आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे संशोधनाअंती खरे ठरले आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सिने नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी सांगितले.उच्चभ्रु लोकांकडून मराठी टिकवण्याच्या आशा जरी कमी असल्या तरी मध्यमवर्गीय लोक मात्र मराठी भाषा टिकवून ठेवतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागामार्फत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. इंग्रजी बोलता येण्यासाठी आपल्याला इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याची गरज नसून मराठी माध्यमात शिकल्यानंतर सुद्धा इंग्रजी आपण बोलू शकतो असे ही त्या पुढे म्हणाल्या. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने माझा केलेला सत्कार हा माझा नव्हता तर तो संस्थेचा होता. संस्थेच्या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या कामाचं एक उत्कर्ष भवन उभारलं गेलं पाहिजे असे सुलेखनकार पद्म श्री अच्युत पालव यांनी सांगितले. या संस्थेने मला घडवलं असून मंडळ हे एक विद्यापीठ आहे असे गौरवोद्गार पालव यांनी काढले.
 
शिक्षणापेक्षा आजच्या काळात सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणं गरजेचे आहे असे प्रतिपादन इंडोको रेमिडीज च्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे पाणंदीकर यांनी केले. या प्रसंगी शारदास्मृती या जाहिरात अंकाचे प्रकाशन कार्यक्रम अध्यक्ष अदिती कारे पाणंदीकर यांनी केले तर प्रणामहस्तलिखिताचे प्रकाशन चिन्मयी सुमित यांनी तर विवेकानंद स्मृती या जाहिरात अंकाच्या दरपत्रकांचे उदघाटन अच्युत पालव यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला, क्रीडा पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या हितेश जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
 
या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक मंडळप्रमुख विकास शिंदे, मान्यवरांचा परिचय उपमंडळ प्रमुख नरेश विचारे तर आभार सहमंडळ प्रमुख सुधीर फके आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणप्रमुख संकेत शिर्के आणि वेद गावडे यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0