घोडबंदर ते तलासरी एन.एच ४८ महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत चौकशी करा खासदार डॉ. हेमंत सवरा यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

29 Jul 2025 16:08:51

वाडा : दि.२९ पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच ४८ घोडबंदर ते तलासरी या दरम्यानची रस्त्याची अत्यंत खराब व धोकादायक स्थिती लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती करणारे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सदर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून,पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दररोज हजारो वाहनचालक, विद्यार्थी व नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्याची ही परिस्थिती अपघातांना कारणीभूत ठरत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पुढील चार प्रमुख मागण्या घोडबंदर ते तलासरी रस्त्याचे तात्काळ पुनर्भरण करणे,रस्त्याच्या कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण करणे,दोषी ठेकेदार व अंमलबजावणी यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे,नियमित देखभाल व खड्डे तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे आदी मागण्या केल्या आहेत.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी खानिवडे (वसई) व आंबोली (तलासरी)या गावांमध्ये महामार्ग ओलांडताना होणाऱ्या धोक्यामुळे, प्रत्येकी एक फूटओव्हर ब्रिज मंजूर करून त्याचे तातडीने बांधकाम सुरू करण्याचीही मागणी केली आहे.
या मागण्यांवर त्वरित प्रतिसाद देत, नितीन गडकरी साहेबांनी सदर मागण्या मान्य केल्या असून, लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे.खासदार डॉ. हेमंत सवरा म्हणाले, "ही कामे पूर्ण झाली तर स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. त्याचबरोबर वरील अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटेल.
Powered By Sangraha 9.0