मुंबई : सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व सायंकाळच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम संत रोहिदास सभागृह,कुर्ला प. येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
आरोग्य शिबिरात डॉ. सरोज बांदेकर यांनी महिलांमध्ये वाढत असलेल्या स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी मोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देत जागृती केली. या उपक्रमात डॉ. शशिकला जाधव यांनी मुंबई विभागातील महिलांसाठी किमान दरात गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच स्तन कर्करोग तपासणी मोफत केली जाईल, असे सांगितले. महिलांमध्ये वाढत असलेल्या मानसिक समस्यांवर डॉ. अमृता पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मॅनकाइड फार्माच्या सहकार्याने ईसीजी, रक्तदाब, न्युरोपॅथी, मधुमेह अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. औषधांचं मोफत वाटपही करण्यात आलं. सुमारे १२५ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सायंकाळच्या सत्रात १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पारंपरिक फेटा व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी शासकीय पुस्तक मोफत देण्यात आले.
समाजात विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शरीरसौष्ठव समर्थ कोचळे, चार्टर्ड अकाऊंटेंट हर्षल चव्हाण, युवा कवयित्री रुची खेतले, एड.सेजल हिंगे, शासकीय अधिकारी किमया पवार-शिरगावकर आणि ज्येष्ठ अभ्यासिका शालन निकम यांचा यामध्ये समावेश होता.
गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. हेमंत जाधव, किर्ती जैन, डॉ. संदीप पाटील, ॲड. विजय गायकवाड, ॲड. प्रणिल गाढवे, हृषिकेश निकम, गौरी शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या दोन्ही उपक्रमांना सकल हिंदू मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.