वसई-विरारच्या माजी आयुक्तांच्या घरावर ईडीची धाड, नेमकं प्रकरण काय?

29 Jul 2025 12:12:38

नालासोपारा : (ED raids former Commissioner of Vasai Virar) सक्तवसुली संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) वसई-विरार शहर मनपाचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसई येथील दीनदयाळ नगरमधील निवासस्थानासह १२ ठिकाणी मंगळवारी सकाळी छापे टाकल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. यातील बहुतांश छापे हे पवार यांच्यांशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी सव्वा सात सुमारास ईडीने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराशी संबंधित असून, काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अजूनही ईडीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र या कारवाईमुळे स्थानिक राजकारणातही खसखस सुरू झाली आहे.

अनिल कुमार पवार यांनी सोमवारीच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार मनोज कुमार सुरववंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती. एक दिवसाआधीच म्हणजेच सोमवारी अनिलकुमार पवार यांचा सत्कार आणि निरोप समारंभ पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळीच ईडीने असा छापा टाकल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ माजली असून, नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आलं आहे. सध्या ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरू आहे.


Powered By Sangraha 9.0