
कांगोमध्ये विशेषतः ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो’ (डीआरसी)मध्ये ख्रिश्चन धर्मीयांचेच वर्चस्व. देशातील लोकसंख्येच्या अंदाजे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोक ख्रिश्चन धर्माचे अनुयायी. त्याचबरोबर याठिकाणी ‘कांगो प्रोटेस्टंट चर्च’ ही एक प्रकारची प्रोटेस्टंट संघटना आहे, जी सुमारे ६० पेक्षा अधिक स्वतंत्र प्रोटेस्टंट चर्चेसना एकत्र आणते. ही संघटना देशाच्या राजकीय व सामाजिक बाबींमध्ये सक्रिय भूमिका घेते. पण, कांगोमधील ख्रिस्ती धर्म अत्यंत वैविध्यपूर्ण. मात्र, ‘अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेस’ (एडीएफ)द्वारा गेली अनेक वर्षे कांगोतील ख्रिस्ती लोकांवर अत्याचार आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ‘एडीएफ’ फक्त लष्करी ठिकाणांवर नाही, तर धार्मिक आणि नागरी संस्थांवर हल्ला करून सामाजिक विघटन आणि धार्मिक संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
पूर्व कांगोतील कोमांडा येथील कॅथलिक चर्च कंपाऊंडवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात किमान २१ हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हा हल्लादेखील ‘एडीएफ’च्या कट्टरपंथींनीच घडवून आणला असून, त्यांनी अनेक घरे आणि दुकानेही यावेळी जाळण्यात आली.
वास्तविक, कांगो आणि ‘एडीएफ’ या दोघांमधील संबंध अत्यंत संवेदनशील व हिंसक संघर्षांनी भरलेले आहेत. ‘एडीएफ’ ही मूळतः युगांडा येथे १९९० सालच्या दशकात उदयास आलेली इस्लामी बंडखोर संघटना. ‘एडीएफ’ने सर्वप्रथम युगांडामध्ये सरकारविरोधी सशस्त्र संघर्ष सुरू केला. मात्र, युगांडातील लष्करी दबावामुळे ‘एडीएफ’चे लष्कर १९९० सालच्या उत्तरार्धात ‘डीआरसी’च्या पूर्वेकडील जंगलात लपून राहू लागले. त्यांनी येथील नॉर्थ किवू आणि इटूरी प्रांतांमध्ये आपली पाळेमुळे रोवली. या भागातील अशांतता आणि दुर्बल प्रशासनामुळे ‘एडीएफ’ला आपले तळ उभारणे सोपे झाले.
त्यानंतर मग हळूहळू ‘एडीएफ’च्या हिंसक कारवायांचे सत्र सुरू झाले. नागरिकांवर हल्ले झाले. त्यामध्ये गावेच्या गावे भस्मसात करणे, लोकांचे शिरच्छेद करणे, महिलांवर बलात्कार, मुलांना संघटनेत जबरदस्तीने भरती करणे, अशा गोष्टी घडू लागल्या. खासकरून ख्रिस्ती समुदायावर, त्यांच्या चर्चवर हल्ले करणे, त्यांच्या शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, रुग्णालये बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त करणे असे प्रकार वाढतच गेले, जे आजही घडताना दिसत आहेत. २०१९ सालापासून आपला ‘इस्लामिक स्टेट’शी संबंध असल्याचे ‘एडीएफ’ने जाहीर केले होते.
ही संघटना कट्टर सलाफी जिहादी विचारधारा पाळते. त्यांच्या मते, ख्रिस्ती धर्म आणि त्याचे अनुयायी शत्रू आहेत. ख्रिस्ती धर्मस्थळे इस्लामविरोधी आहेत. इस्लामी शासन प्रस्थापित करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट. त्यासाठी ते धार्मिक शुद्धतेच्या नावाखाली ख्रिस्ती समाजावर हल्ले करतात आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. ‘एडीएफ’ला असे वाटते की, ग्रामीण कांगोमध्ये चर्च हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचे केंद्र असते. जे मानवाधिकार, शिक्षण आणि शांतीचे प्रसार करतात, त्यामुळे संघटनेला वाटते की, चर्च उद्ध्वस्त केल्यास लोकांच्या मनोबलावर मोठा परिणाम होईल. एकंदरीत धर्मविरोधी कट्टरता, समाजात भीती आणि नियंत्रण प्रस्थापत करणे, चर्चचा सामाजिक प्रभाव कमी करणे, आर्थिक लूट आणि धार्मिक दहशत, ‘इस्लामिक स्टेट’च्या जिहादी अजेंड्याशी सुसंगती ही त्यांची मुख्य उद्दिष्टे आहेत आणि या अजेंड्यावर ते वर्चस्व गाजवू पाहत आहेत.
आज आपण पाहिले, तर कांगो सरकारने ‘एडीएफ’विरुद्ध लष्करी मोहिमा राबविण्यास सुरुवात केली असली, तरी काही भागांतील ख्रिस्ती गावे ओसाड पडली आहेत. कारण, येथील लोक ‘एडीएफ’च्या भीतीने स्थलांतर करू लागले आहेत. ‘एडीएफ’ विरोधात मोनूस्को आणि युगांडा लष्कर उभे असून कांगोनेही खंबीरपणे ‘एडीएफ’ विरोधात उभे राहणे गरजेचे आहे.
भारत हा दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेणारा देश आहे. भारताने आंतरराष्ट्रीय मंचांवर अशा दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाईसाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे भारताकडे आदर्श म्हणून कांगोने पाहिले, तर कांगो नक्कीच ‘एडीएफ’ विरुद्धच्या लढाईत यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.