कल्याण : कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
कल्याण पूर्वेतील कैलासनगर आणि खडेगोळवली आदी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याविरोधात भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी काही दिवसापूर्वी ड प्रभाग कार्यालयात धडक दिली होती. त्यावेळी त्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले होते. परंतु त्यानंतर ही पाणी समस्या सुटली नसल्याने राय यांनी मंगळवारी नागरिकांसह ड प्रभाग कार्यालयात धडक दिली. यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. परंतु त्यानंतरही आंदोलनकर्त्याची भेट घेण्यासाठी अधिकारी वर्ग येत नव्हता. त्यामुळे नागरिक जास्तच संतप्त झाले. आमच्या तोंडाचे पाणी चोरणाऱ्या महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने आमच्यासमोर यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पण कोणीही अधिकारी वर्ग आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर महापालिकेच्या शहर अभियंत्या अनिता परदेशी आणि सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी चर्चा केली. पण संतप्त नागरिक काहीही ऐकण्यास तयार नव्हते. नागरिक आयुक्तांनी समोर यावे या मागणीवर ठाम होते. अखेर चर्चेअंती महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाणी समस्या सोडवण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.