नवी दिल्ली : (Amit Shah reveals Inside Story of Operation Mahadev) "पहलगामचा हल्ला अत्यंत भीषण होता, त्यावर चर्चा होत आहे आणि ती झालीही पाहिजे. परंतु ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ऑपरेशन महादेवसंदर्भात महत्त्वाची माहिती देतो.", असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऑपरेशन महादेवबद्दल संसदेत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव कधी सुरु झालं? दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली? याची सगळी माहिती अमित शाह यांनी संसदेत सांगितली.
अमित शाह काय म्हणाले?
"मी सीआरपीएफ, लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना लोकसभेतील सर्व सदस्यांतर्फे धन्यवाद देतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मेला झाली. हे म्हणतात जम्मू-काश्मीरला राहुल गांधींशिवाय कोणी गेलं नाही. हे कुठल्या चष्म्यातून पाहतात ते माहित नाही. एक वाजता पहलगाम येथे हल्ला झाला. मी साडेपाच वाजता श्रीनगरमध्ये उतरलो. त्याच दिवशी रात्री एक सुरक्षा बैठक झाली."
ऑपरेशन महादेव कसं राबवलं?
"२३ एप्रिल रोजी आम्ही एक सुरक्षा दलांची बैठक घेतली. यांमध्ये सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश होता. देशावर हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ द्यायचं नाही, यासाठी आम्ही पहिला निर्णय घेतला. यासाठी आम्ही कडक व्यवस्था केली. त्यानुसार आम्ही कुणालाही पळून जाऊ दिलं नाही. त्यांना ठार केलं."
आयबीला पहिला ह्यूमन इंटेलिजन्स कधी मिळाला?
"२२ मे रोजी आयबीला दहशतवाद्यांसंदर्भात गुप्त माहिती मिळाली. दाचीगाममध्ये दहशतवादी असल्याचे गुप्तचर यंत्रणा मिळाली. यानंतर २२ मे ते २२ जुलै या काळात आमच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांचे तपासले. २२ जुलैला मोठं यश मिळालं , सेन्सॅारच्या माध्यमांतून ते दहशतवादी असल्याचे समजले. यानंतर चार पॅराफोर्सेसचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरु केली. या कारवाईत सोमवारी २८ जुलैला तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले."
दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवली
"दहशतवाद्यांच्या मृतदेहांची रितसर ओळख पटवण्यात आली. एनआयएने या दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या, जेवण पोहोचवणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतलं होतं. या दहशतवाद्यांना मारल्यानंतर त्यांचे मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले. त्यांना आसरा देणाऱ्यांकडून या दहशतवाद्यांची ओळख पटवून घेण्यात आली. चार जणांनी ओळख पटवली की, ज्या तिघांना ठार केले हे तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम हल्ला केला."
काडतुसांची एफएसएल चाचणी
"इतकेच नाही, आम्ही एवढ्यावरच विश्वास ठेवला नाही, दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी जी काडतुसे मिळालेली, त्याचा एफएसएल रिपोर्ट बनवला आहे. या दहशतवाद्यांकडे M-9 आणि AK-47 रायफल्स होत्या. या रायफल्स रात्री विमानाने बारा वाजता चंदीगडला पाठवल्या. तिथे एका खास पद्धतीने या रायफल्स याच दहशतवाद्यांच्या असल्याच्या ओळख पटवली” असं अमित शाह म्हणाले.
तसेच "ऑपरेशन सिंदूर राबवून मोदींनी दहशतवाद्यांच्या आकांचा बदला घेतला आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.", असेही ते म्हणाले.