मुंबई, मुंबई मेट्रो २ अ आणि ७ वरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नियमित प्रवास कार्ड आणि पासवर थेट २५ टक्के सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून याबाबत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आली आहे.
मेट्रो २ अ दहिसर पूर्व आणि अंधेरी पश्चिम मधील डीएन नगरला जोडते, तर लाईन 7 अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व दरम्यान धावते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, अपंग व्यक्तींना वैद्यकीय किंवा अपंगत्वाचे सरकारी प्रमाणपत्र यांसारखी वैध कागदपत्रे सादर करावी लागतील, तर ज्येष्ठ नागरिकांना वयाचा दाखला द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना सवलतीसाठी पात्र होण्यासाठी शाळेच्या ओळखपत्रासह त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे पॅनकार्ड दाखवावे लागेल. ही कागदपत्रे लाईन २अ आणि मार्ग ७ वरील कोणत्याही तिकीट खिडकीवर नागरिक दाखवू शकतात.