मुंबई : (Bhushan Gagrani) "मुंबईतील कबुतरखाने बंद करावे लागतील, त्याला दुसरा पर्याय नाही", असे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले आयुक्त?
"कबुतरखाने बंद करावे लागतील, त्याला दुसरा काही पर्याय नाही. कारण वारंवार सिद्ध झालेले आहे की, ते आजूबाजूच्या नागरिकांसाठी घातक आहे. आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अशा ज्या समस्या आहेत या केवळ नियम करुन किंवा त्यांची कठोर अंमलबजावणी करुन हे प्रश्न सुटणार नाहीत. ज्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय किंवा ज्यांच्यामुळे होतोय त्यांनी देखील यामध्ये सहकार्य करणे तो प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे." असे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे
तीन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताना शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या मनीषा कायंदे यांनी कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमुळे श्वसनाचे आजार होतात, त्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले होते.