क्वालालंपूर : (Thailand and Cambodia agree to ceasefire) थायलंड आणि कंबोडियाच्या प्रमुखांनी सीमा संघर्ष संपवण्यासाठी तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अशी घोषणा मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या चर्चेनंतर केली. मलेशिया सध्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचे (आसियान) अध्यक्षपद भूषवत आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे सोमवारी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा झाली.
"२८ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीपासून तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदी लागू होईल," असे मलेशियामध्ये मध्यस्थी चर्चेनंतर पंतप्रधान अन्वर यांनी घोषणा केली. कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी बैठकीच्या निर्णयाचे स्वागत केले आणि संक्षिप्त पत्रकार परिषदेच्या शेवटी हस्तांदोलन केले. ४ ऑगस्ट रोजी कंबोडियामध्ये सीमा शिखर परिषद देखील आयोजित केली जाणार आहे.
थायलंड आणि कंबोडियाच्या पूर्व सीमेवरील एका वादग्रस्त भागात गुरुवारी चकमक सुरू झाली, दोन्ही बाजूंनी पहिल्या गोळीबारासाठी एकमेकांना दोषी ठरवले. दोन्ही देशांमध्ये लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत आणि या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील या सर्वात भीषण संघर्षात ३० हून अधिक लोक मारले गेले आहेत.