भारतात डॉल्फिनच्या अनेको प्रजाती आढळत असल्या, तरी स्पिनर डॉल्फिन ही संख्येने त्यामधील सर्वाधिक आढळणारी प्रजात. याच प्रजातीविषयी माहिती देणारा हा लेख...
बंगालच्या उपसागरापासून ते हवाईच्या निळ्या समुद्रापर्यंत आढळणारा स्पिनर डॉल्फिन (Stenella longirotstris) हा समुद्रातील सर्वांत चपळ सस्तन प्राणी आहे. के. एस. एस. एम. युसूफ आणि सहकार्यांच्या 2010च्या अभ्यासानुसार, भारतीय समुद्रात ही सर्वाधिक प्रमाणात आढळणारी डॉल्फिन प्रजाती आहे. त्यांच्या हवेत उंच उडी मारून फिरण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनामुळे त्यांना ‘स्पिनर’ हे नाव मिळाले आहे. मात्र, मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकणे, समुद्री प्रदूषण आणि पर्यटनामुळे होणारा त्रास यामुळे या प्रजातीचे भविष्य धोक्यात आले आहे.
अलीकडील जनुकीय संशोधनानुसार, स्पिनर डॉल्फिनचा समावेश असलेले ‘स्टेनेला’ हे प्रजातीसमूह (genus) खरे तर ’पॅराफायलेटिक’ असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्याच्या ’स्टेनेला’ गटात ‘स्पिनर डॉल्फिन’ (Stenella longirotstris), स्पॉटेड डॉल्फिन (Stenella attenuata) यांचा समावेश आहे. पण त्यांच्याच पूर्वजापासून उत्क्रांत झालेल्या काही इतर प्रजातींचा यात समावेश नाही. ही अपूर्ण वर्गीकरण पद्धत सूचित करते की, येत्या काही वर्षांत ’स्टेनेला’ प्रजातिसमूहाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व संबंधित वंशज योग्य रितीने एकाच गटात समाविष्ट होतील. याशिवाय, अशा डॉल्फिन्सचीही नोंद केली गेली आहे, ज्या स्पिनर डॉल्फिन आणि इतर प्रजातींमधील संकरित (hybrid) असल्याचे दिसते. हे सर्व निष्कर्ष सूचित करतात की सागरी सस्तन प्राण्यांच्या वर्गीकरणात मूलभूत बदल होण्याची शक्यता आहे. स्पिनर डॉल्फिनचे विस्तारक्षेत्र पॅनट्रॉपिकल (उष्णकटिबंधीय समुद्रांमध्ये पसरलेले) आहे आणि ते पँट्रॉपिकल स्पॉटेड डॉल्फिनच्या विस्तारक्षेत्राशी जवळजवळ एकरूप आहे. भारतातील बंगालच्या उपसागरात आढळणार्या स्पिनर डॉल्फिन इतर भागांतील त्यांच्या समकक्षांपेक्षा वेगळ्या आहेत, असे युसूफ आणि सहकार्यांच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
शारीरिक रचना आणि वैशिष्ट्ये
स्पिनर डॉल्फिनची ओळख त्याच्या लांब, पातळ चोच, त्रिकोणी पाठीचा पंख आणि विशिष्ट रंगछटेमुळे होते. एनसायक्लोपीडिया ऑफ मरीन मॅमल्स (2009) नुसार, त्यांच्या शरीरावर तीन मुख्य रंग दिसतात : पाठीवर गडद राखाडी (केप), बाजूंना फिकट राखाडी आणि पोटाकडे पांढरा. प्रौढ डॉल्फिनची लांबी साधारण 129 ते 235 सेमी आणि वजन 23 ते 80 किलो असते. नर हे मादीपेक्षा थोडे मोठे असल्याचे युसूफ आणि सहकार्यांच्या 2010च्या अभ्यासात नमूद केले आहे.
उपप्रजाती आणि भौगोलिक फरक
विलियम एफ. पेरीन (2009) यांच्या संशोधनानुसार, स्पिनर डॉल्फिनच्या चार उपप्रजाती जगभर आढळतात :
ग्रेचा स्पिनर (S.I. longirotstris) - ही सर्वांत व्यापक उपप्रजात आहे.
ईस्टर्न स्पिनर (S.I. orientalis) - पूर्व पॅसिफिकमध्ये आढळते.
मध्य अमेरिकन स्पिनर (S.I. centroamericana) - पूर्व पॅसिफिकमधील स्थानिक प्रजात.
खुजा स्पिनर (S.I. roseiventris) - आग्नेय आशियातील लहान आकाराची प्रजात.
वर्तन आणि सामाजिक जीवन
स्पिनर डॉल्फिनचे हवेत झेप घेणे हे त्याला ओळखायचे वैशिष्ट्य आहे. पेरीन (2009) यांनी नमूद केल्याप्रमाणे, हे वर्तन संप्रेषण, खेळ किंवा शरीरावरील परजीवी काढून टाकण्यासाठी असू शकते. हे डॉल्फिन गटात राहतात. काही वेळा डझन, तर कधी हजारोंच्या संख्येने. रात्री ते मासे आणि स्क्विड्सच्या शोधात खोल पाण्यात जातात, तर दिवसा उथळ खाड्यांमध्ये विश्रांती घेतात. स्पिनर डॉल्फिनच्या जीवनचक्राचा इतर बहुतेक डॉल्फिन प्रजातींपेक्षा अधिक सखोल अभ्यास केला गेला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे ट्यूना मासेमारीदरम्यान मिळालेले असंख्य नमुने. संशोधनानुसार, या डॉल्फिनचा गर्भधारणा कालावधी साधारण दहा महिने, पिल्लांना दूध पाजण्याचा कालावधी एक ते दोन वर्षे, तर दोन पिल्लांमधील अंतर सुमारे तीन वर्षे असते. मादी डॉल्फिन चार ते सात वर्षांत लैंगिकदृष्ट्या परिपक्व होते, तर नरांसाठी हा कालावधी सात ते दहा वर्षांचा असतो. ही सर्व माहिती विलियम एफ. पेरीन (2009) यांच्या संशोधनाशी पूर्णतः सुसंगत आहे आणि या प्रजातीच्या संवर्धनासाठी महत्त्वाची ठरते. फ्युमागाली एट अल (2018) यांच्या अभ्यासानुसार, हे डॉल्फिन विश्रांतीच्या वेळी शांत, एकसंध गटात राहतात आणि कमी आवाज करतात.
आहार आणि निवासस्थान
स्पिनर डॉल्फिनचा आहार त्यांच्या निवासस्थानानुसार बदलतो. पूर्व आणि पश्चिम पॅसिफिकमधील खुल्या समुद्रातील डॉल्फिन प्रामुख्याने लहान मेसोपेलाजिक मासे आणि स्क्विड खातात, तर दक्षिण-पूर्व आशियातील खुजा उपप्रजाती प्रवाळ खडकांवरील मासे आणि अपृष्ठवंशी प्राणी खातात. आर. पी. कुम्मारन (2002) यांनी करंट सायन्समध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात नमूद केले आहे की, भारतीय समुद्रातील स्पिनर डॉल्फिनच्या पोटात मुख्यतः कोळंबी आढळल्या आहेत. तसेच, जे. पी. कर्भरी आणि सहकार्यांनी (1985) महाराष्ट्राच्या किनार्यावर अभ्यास केलेल्या डॉल्फिनच्या पोटात मेगॅलॅस्पिस कॉर्डिला (मासे) आणि लोलिगो डुवौसेली (स्क्विड) आढळले होते.
भारतातील परिस्थिती
‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CMFRI)’च्या 2013च्या अहवालानुसार, भारतीय समुद्रांमध्ये स्पिनर डॉल्फिन ही सर्वाधिक प्रमाणात आढळणारी डॉल्फिन प्रजाती आहे. मात्र, युसूफ आणि सहकार्यांच्या (2008) अहवालानुसार, भारतीय किनारपट्टीवर दरवर्षी सुमारे नऊ हजार ते दहा हजार डॉल्फिन मासेमारीच्या जाळ्यात अडकतात. यात स्पिनर डॉल्फिनचा मोठा समावेश आहे. विशेषतः ट्यूना आणि सीरफिश मासेमारीमध्ये. महाराष्ट्राच्या किनार्यावर, स्पिनर डॉल्फिन्सना स्थानिक भाषेत गादा किंवा हिमरा म्हणतात. कर्भरी आणि सहकार्यांच्या (1985) अभ्यासानुसार, गिलनेट जाळ्यांमध्ये अडकून हे डॉल्फिन मरतात. त्यांच्या पोटात आढळलेले मासे आणि स्क्विड हे स्थानिक समुद्री पर्यावरणाशी त्यांचे निकटचे नाते दर्शवतात. महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं, तर अजूनही या प्रजातीबद्दल पुरेसे संशोधन येथे करण्याची गरज आहे. त्याचा अधिवास, वर्तणूक आणि मासेमारीदरम्यान या प्रजातीबरोबर येणारे मच्छीमार मंडळींचे नाते आपल्याला समजून घेतले पाहिजे. स्पिनर डॉल्फिन हा समुद्राच्या सौंदर्याचा आणि सजीवतेचे प्रतीक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असला तरी, योग्य संवर्धन उपाययोजनांद्वारे आपण या अद्भुत प्राण्यांना वाचवू शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि शास्त्रीय संशोधन यांच्या मदतीने स्पिनर डॉल्फिनचे भविष्य उज्ज्वल करता येईल. चला, समुद्राच्या या अक्रोबॅटच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ!
प्रदीप चोगले
(लेखक सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
9029145177