पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

28 Jul 2025 15:41:08

खानिवडे
: श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ पर्यंत भाविक आपला भाव प्रकट करण्यासाठी शिवालयात येत होते.

वसई तालुक्यात ग्रामदेवतांची मंदिरे सर्वात जास्त असली तरी ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेली प्राचीन शिवालये खूप मोठ्या संख्येने आहेत . यातील वसई पूर्व ग्रामीण भागात अरण्यात असलेल्या तुंगारेश्वर , भालीवली आणि ईश्वरपुरी या प्राचीन शिव मंदिरात श्रावणी सोमवारी पहाटे पासून शिवभक्तांची मोठी रीघ लागलेली होती.जलाभिषेक, पूजा , अर्चा व दर्शन घेऊन आपली श्रद्धा वाहताना येथील मनमोहक निसर्गयरम्य वातावरणात मंत्रमुग्ध झालेल्या भाविकांच्या रांगा पाहायला मिळत होत्या . या शिवालयांमध्ये महामार्गावरील सातीवली येथून जाता येणारे निसर्गरम्य पूर्वेतील प्राचीन तुंगारेश्वर महादेव मंदिर , याच अरण्याच्या दुसऱ्या बाजूने असलेले ईश्वरपुरी येथील आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर,तर महामार्गावरील भालीवली येथील वृंदावन टेकडी महादेव मंदिर यांचा समावेश असून येथे दर सोमवारी महापूजा, महाप्रसाद, तीर्थ यांचे आयोजन करण्यात येते .येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकां बरोबर सद्ध्या नालासोपारा , वसई या भागातून कावड यात्रा काढण्यात येतात .यात भगव्या वस्त्रांतील शेकडोंच्या संख्येने खांदी कावड घेतलेले यात्री भोले बाबाचा जयकार करत कैक मैल पायी यात्रा करून भोळ्या शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करत आहेत. यात तरुणाई ची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती .या कावड यात्रींनी चालताना सारा परिसर भोलेनाथाच्या जयकाराने दुमदुमून टाकला होता .तर मंदिरांतून शिवस्त्रोत मंजुळ स्वरात ऐकू येत होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविक देवाधिदेव महादेवपुढे नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये म्हणत आपला भाव प्रकट केला.
Powered By Sangraha 9.0