पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

28 Jul 2025 12:26:41

P Chidambaram


 
नवी दिल्ली : (P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
 

काय म्हणाले पी. चिदंबरम?
 

द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी काही प्रश्न उपस्थित करतेवेळी म्हटले की, "दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएने केलेल्या कामाचा खुलासा करण्यास सरकार तयार नाही. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख एनआयएने पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरून? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं?" असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.


 
पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यावर भाजपची टीका
 

पी. चिदंबरम यांचं वक्तव्य समोर आल्‌यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, "पुन्हा एकदा काँग्रेस पाकिस्तानला 'क्लीन चिट' देण्यासाठी धावाधाव करते आहे. आपले लष्कर पाक पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे. मात्र आता कांग्रेसचे नेते इस्लामाबादच्या बचाव पक्षाच्या वकीलांसारखे वाटत आहेत", अशी टीका अमित मालवीय यांनी केली. "जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा कोणतीही अस्पष्टता नसावी. परंतु काँग्रेसमध्ये असे कधीच नसते - ते नेहमीच शत्रूचे रक्षण करण्यासाठी पुढे येतात," असेही ते म्हणाले.






Powered By Sangraha 9.0