
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, चीन व पाकिस्तानने बळकाविलेली भारताची भूमी यांसारखी असंख्य उदाहरणे काँग्रेसच्या नाकर्त्या राजवटीचे पुरावे आहेत. पण, काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही; कारण हा आता पाकिस्तानवादी पक्ष बनला आहे. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेला कालपासून प्रारंभ झाला असून त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली भाषणे पाहिल्यास हा पक्ष आता पूर्णपणे पाकिस्तानवादी झाल्याचे स्पष्ट होते. या पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी तर पहलगाममधील दहशतवादी हे पाकिस्तानी होते, असे सरकार कसे म्हणू शकते, असा युक्तिवाद करून आपल्या देशद्रोहीपणाचे प्रमाणच दिले. पण, आता एकंदरीतच भारतविरोध हे संपूर्ण काँग्रेस पक्षाचेच व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. या पक्षाच्या नेत्यांनी केलेली भाषणे आणि उपस्थित केलेले प्रश्न हे सरकारवरच अप्रत्यक्ष दोषारोप करणारे असून त्यामागील त्यांचा हेतू शुद्ध नाही, हे स्पष्ट होते. या भाषणांमुळे भारत कधीच शक्तिशाली होऊ नये, अशी या पक्षाची इच्छा आहे काय, अशी शंका येते. मतांच्या लाचारीसाठी झालेली काँग्रेसची ही अवनती त्या पक्षाला नामशेष करील, यात शंका नाही.
चिदंबरम यांनी आपल्या भाषणात जे प्रश्न उपस्थित केले, ते पाहता त्यांना या हल्ल्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे म्हणायचे आहे, असे दिसते. पहलगाममध्ये हे दहशतवादी कोठून आले, त्यांची ओळख सुरक्षा यंत्रणांनी पटविली आहे का, ते पाकिस्तानातूनच आले आहेत, याचा काय पुरावा, या संघर्षात भारताचे किती लष्करी नुकसान झाले, यासारखे त्यांचे प्रश्न पाहता ते भारताच्या बाजूने आहेत की पाकिस्तानच्या, असा प्रश्न पडतो. हे दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले हा प्रश्न विचारायचा असेल, तर अजमल कसाब आणि त्याचे नऊ साथीदार भारतात कसे आले, याचे उत्तरही चिदंबरम यांनी द्यावे. जणू काँग्रेसच्या राजवटीत भारतात कधी पाकिस्तानी दहशतवादी घुसलेच नव्हते. पुलवामा येथे लष्करी ताफ्यावर हल्ला झाला, तेव्हाही काँग्रेसचा सवाल होता की, तेथे ‘आरडीएस’ आलेच कसे? मुंबईत १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते, तेव्हा देशात ही स्फोटके कशी आली, याचे उत्तर काँग्रेसने दिले आहे का? प. बंगालमध्ये पुरुलिया येथे टनावारी शस्त्रास्त्रांचा साठा विमानातून टाकण्यात आला, तेव्हा केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. काँग्रेसच्याच राजवटीत भारताची हजारो किमी भूमी पाकिस्तान आणि चीनने घशात घातली आहे. तेव्हा चिदंबरम असोत की काँग्रेस, यांनी भलतेच प्रश्न विचारू नयेत. अन्यथा त्यांच्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या अब्रूची लक्तरे फडकत राहतील.
चिदंबरम हे केवळ गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले असे नव्हे, तर देशाचे अर्थमंत्री म्हणूनही ते विलक्षण अपयशी ठरले आहेत. याच चिदंबरम यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जगातील पाच सर्वांत नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये (फ्रजाईल फाईव्ह) गणली गेली आणि भारतीय चलनी नोटा छापणारे यंत्र पाकिस्तानला विकण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानला अब्जावधी रुपयांच्या नकली चलनी नोटा भारतात वितरीत करता आल्या. नोटबंदीचे हेही प्रमुख कारण होते. २०१४ साली लोकसभा निवडणुकींचे निकाल लागण्याच्या दोन दिवस आधी चिदंबरम यांनी सोने आयात करण्यात सवलत देणारी योजना सुरू केली आणि दोनच दिवसांत ती बंदही केली. या मर्यादित काळात काळ्या पैशांनी विकत घेतलेले कोट्यवधी रुपयांचे सोने भारतात कायदेशीररित्या आयात झाले. या निर्णयात चिदंबरम यांचे हितसंबंध गुंतले नसतील, असे म्हणणे हे सुज्ञ भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करणारे आहे. स्वत: चिदंबरम यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप असून त्यासंदर्भात न्यायालयात खटलेही सुरू आहेत. तेसुद्ध जामिनावरच बाहेर आहेत. त्यावरून या चिदंबरम यांचे चरित्र काय लायकीचे आहे, ते दिसून येते.
मुंबईवर दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जो हल्ला केला, ते छोटेखानी युद्धच होते आणि त्यात सुमारे १८० निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याइतकी हिंमत तत्कालीन काँग्रेस सरकारच्या मनात नव्हती. तेव्हा देशाचे गृहमंत्री शिवराज चाकूरकर-पाटील यांना दिवसाच्या विविध वेळेत आपल्या अंगावर वेगवेगळे पोषाख कसे दिसतील, याची फिकिर अधिक होती. तेव्हा त्यांच्या जागी या चिदंबरम महाशयांना गृहमंत्री करण्यात आले होते. पण, चिदंबरम यांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याऐवजी त्या देशापुढे पुराव्यांचे कागदी घोडे नाचविले. या सर्व पुराव्यांना पाकिस्तानने थेट कचराकुंडीत फेकून दिले. पण, तेव्हाही त्यांची आणि काँग्रेस सरकारची पाकिस्तानवर हल्ला करण्याची हिंमत झाली नाही. कदाचित तसे करण्याची तत्कालीन काँग्रेस सरकारची इच्छाही नसावी. आज जेव्हा चिदंबरम आणि काँग्रेसचे अन्य गणंग पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानचीच भाषा बोलतात, तेव्हा त्यावेळी काँग्रेसकडून पाकिस्तानवर ठोस कारवाई का झाली नाही, त्याचे रहस्य उघड होते. कारण, काँग्रेस हा पाकिस्तानधार्जिणा पक्ष बनला होता. ही गोष्ट आज उघड होत आहे.
चिदंबरम यांनीच मुंबईवरील हल्ल्याचे ‘भगवा दहशतवाद’ असे संबोधन केले. रा. स्व. संघानेच हा हल्ला घडविल्याचा बनाव भारतीयांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न चिदंबरम आणि दिग्विजय सिंह या काँग्रेस नेत्यांनी चालविला होता. सुदैवाने अजमल कसाब जिवंत पकडला गेल्याने या हल्ल्याचा खरा सूत्रधार पाकिस्तान असल्याचे सिद्ध झाले. हाच काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना धर्म नसतो, अशी पोपटपंची करीत असतो. त्याचा हा दावा पहलगाम हत्याकांडाने पार धुळीस मिळविला आहे. पण, मुंबईवरील हल्ल्याला हिंदू धर्माशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न त्यांच्या दुटप्पी वर्तनाचे द्योतक आहे. कुत्र्याचे शेपूट १२ वर्षे नळीत घातले, तरी बाहेर काढल्यावर ते वाकडेच राहिल्याचे दिसेल. तसेच, चिदंबरम असो की काँग्रेस पक्ष, यांचे भारतविरोधी शेपूट कायमच वाकडे राहील, हे स्पष्ट आहे.
भारतविरोधी भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेसवर टीका करताना या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीत मत देणार्या मतदारांनाही तितकेच दोषी धरले पाहिजे. काँग्रेसचे नेते निवडूनच आले नाहीत, तर या पक्षाला कदाचित आपली चूक कळूनही येईल. पण, जोवर राहुल गांधी यांच्यासारख्यांना नेतेपदी ठेवले जाते, तोपर्यंत या पक्षाकडून भारतविरोधी गरळच ओकली जाईल, हे निश्चित.