
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि अध्यात्माची शाल पांघरलेल्या नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो. तिथे विसावलेल्या प्रत्येक सत्ताकाळातील पाऊलखुणा पावलापावलावर ठळकपणे उमटलेल्या सहज दिसून येतील. वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता येथे वास्तव्यास राहिले, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वास्तव्याला आलेल्या आनंदीबाई जोशी यांनी नवसाला पावल्याने नवश्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिकडे चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रेणुकामातेचे मंदिर आणि रंगमहाल बांधत वास्तुकलेचा अद्भुत नमुना पेश केला. पुढे इंग्रजांनी नाशिकमध्ये नोटांचा छापखाना सुरू केला. पण, बदलत्या काळानुसार नाशिकच्या सौंदर्याला जाणुनबुजून नख लावण्याचे उद्योग काहीजणांकडून सुरू आहेत. ज्या अभेद्य सह्याद्रीने मराठेशाहीचे अटकेपार झेंडे लावण्यास हातभार लावला, त्या सह्याद्रीच्या डोंगरांना नाशिकमध्ये पोखरण्याचे काम मागील काही वर्षांपासून खाणमाफियांकडून राजरोज सुरू आहे. त्यामुळे ‘डोंगर पोखरून निघाला उंदीर’ ही उक्ती कालबाह्य करून ‘डोंगर पोखरून सोन्याचा हत्ती’ अशी नवी म्हण खाणमाफियांनी आपल्या कर्तृत्वाने तयार केली आहे. पैशांच्या लोभापायी जाज्वल्य इतिहास अंगाखांद्यावर मिरवलेले हे डोंगर पोखरले जात असून, ब्रह्मगिरीचा तळ पोखरण्याचाही प्रकार भूमाफियांकडून करण्यात आला. त्यातच नाशिक परिसरातील पांडवलेणी, संतोषा डोंगर, रामशेज, चामरलेणी, चांदवड या ठिकाणच्या डोंगरसंपदेला नख लावण्याचाही प्रकार झाला. खाणमाफियांनी इथले डोंगर अर्ध्यापेक्षा अधिक पोखरले असून, त्यांचे अस्तित्वच नाहीसे करण्याचा घाट घातला जात आहे. सुरुंग लावून डोंगर पोखरले जात असताना प्रशासनातील अधिकार्यांनी मात्र अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारत आपले उखळ पांढरे करण्यातच धन्यता मानली. सर्वांना हवा असलेला लोण्याचा गोळा कमी अधिक झाल्याने चार वर्षांपूर्वी काही अधिकार्यांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडले. हे असेच सुरू राहिल्यास दाट वनराई, नदी, मुक्त पक्षी, दूरवर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातून डोकावणारा सूर्य असे चित्र काही वर्षांत केवळ कागदावरच बघायला मिळेल. आता झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणून उरलेले डोंगर राखण्याचे शिवधनुष्य सर्वांनाच पेलावे लागेल.
हतबल जनताविकासकामे रखडली की, सर्वचजण लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडायला तयार असतात. बर्याचवेळा त्यांना माध्यमांसह सामान्य लोकही धारेवर धरत जाब विचारतात. तरीही मतदारांनी मतांचे भरभरून दान आपल्या झोळीत टाकले आहे, याची जाण राखत हे लोकप्रतिनिधी थोडेफार का होईना, पण विकास साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेव्हा शासनाकडून प्रशासक नेमला जातो, तेव्हा सर्वसामान्यांना कसे हाल सोसावे लागतात, याचा अनुभव सध्या नाशिककर जनता घेताना दिसत आहे. सध्या नाशिक महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने मागील तीन ते चार वर्षांपासून महापालिकेची किल्ली प्रशासक म्हणून आयुक्तांच्या हवाली करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकचा विकास चहुबाजूंनी थांबला असून, समस्यांचा मात्र डोंगर उभा राहिल्याचे सध्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे हे अधिकारी आपल्या खुर्चीला चिकटून बसत असल्याने त्यांच्यात एक प्रकारचा हेकेखोरपणा आला असून, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला प्रशासक म्हणून चांगला कारभार करावा लागणार आहे, हेच मुळी हे अधिकारी विसरले आहेत. नाशिक महापालिकेत कोणत्याही सामान्य व्यक्तीने फेरफटका मारला, तरी तेथे कशी अनागोंदी सुरू आहे, हे चटकन लक्षात येईल. नाशिकच्या उशाला मोठ-मोठी धरणे आणि जोरदार पावसातही शहरातील बर्याच भागांत लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हे कमी की काय म्हणून रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, विचारता सोय नाही. बरं हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी नाही असेही नाही. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी ९० कोटी रुपयांच्या कामाला पावसाळ्यापूर्वीच कार्यारंभ दिल्याचे बोलले जात आहे. मग रस्ते दुरुस्तीचे घोडे अडले कुठे आणि ९० कोटी रुपयांचा खुर्दा कोणी उडवला, या गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याला दोन वर्षांचा कालावधी राहिला आहे. त्यादृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ रामकाल पथच्या उभारणीला आतापर्यंत सुरुवात व्हायला पाहिजे होती. पण, त्याचेही अजून भिजत घोंगडे पडले आहे. परिणामी, लोकप्रतिनिधीच विकास करू शकतात, ही पक्की धारणा नाशिककरांची झाली नसेल, तर नवलच म्हणावे लागेल.