विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या ‘जनऔषधी योजने’चा सर्वाधिक लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ या राज्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार कोणताही दुजाभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय सीमांचा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात ठेऊन कार्य करीत असल्याचे यावरून दिसून येते.
दि. ३० जून या तारखेपर्यंत संपूर्ण भारतात १६ हजार, ९१२ जनऔषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. उच्च दर्जा पण मूल्य कमी असलेली जेनेरिक औषधे या केंद्रांच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून दिली जात आहेत. या जनऔषधी केंद्रांमुळे जनतेचे अंदाजे ३८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. जनऔषधी केंद्रांचा सर्वाधिक लाभ केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना झाला असल्याची माहिती केंद्र सरकारकडून लोकसभेत देण्यात आली. केरळमध्ये १ हजार, ५२५, कर्नाटकात १ हजार, ४१७ आणि तामिळनाडूमध्ये १ हजार, ३५७ जनऔषधी केंद्रे आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण लक्षात ठेऊन या जनऔषधी केंद्रांचे कार्य सुरू आहे. या योजनेमध्ये कोणत्याही राज्यासमवेत दुजाभाव केला जात नसल्याचे या माहितीवरून दिसून येते. ‘पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजना’ ही योजना २००८ साली सुरू करण्यात आली असली, तरी या कामाने खरा वेग घेतला तो २०१४ सालापासून. त्या आधी ही योजना तशीच धूळ खात पडून होती. पण, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारने या योजनेत प्राण फुंकले. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये तर जनऔषधी केंद्रांच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राहिली. देशातील जनऔषधी केंद्रांपैकी केवळ या तीन राज्यांमध्ये २० टक्के केंद्रे आहेत. आता २०२७ सालापर्यंत संपूर्ण देशामध्ये एकूण २५ हजार जनऔषधी केंद्रे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. केंद्र सरकार कोणत्याही राज्याशी दुजाभाव न करता व्यवहार करीत आहे हे या योजनेवरून दिसून येते.
ओडिशातील महिलांचे कौतुक!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १२४व्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये ओडिशास्थित महिलांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यामधील प्रमिला प्रधान नावाच्या महिलेने हाती घेतलेल्या उपक्रमाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली. प्रमिला प्रधान या ‘राधाकृष्ण संकीर्तन मंडली’ या संस्थेच्या माध्यमातून कीर्तने करून, जंगलात जे वणवे लागतात, त्यास प्रतिबंध कसा करावा, याबद्दल समाजजागृतीचे कार्य करीत आहेत. तसेच, याच राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील ६५० हून अधिक वनवासी महिलांनी संथाली साडी विणण्याच्या प्रक्रियेचे पुनर्जीवन केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. संथाली साडी विणण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन केल्याबद्दल आणि या कार्याच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचे कार्य होत असल्याबद्दल त्यांचेही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. प्रमिला प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ‘राधाकृष्ण संकीर्तन मंडली’ या गटातील महिला समाजामध्ये पर्यावरण जागृतीचे कार्य करीत आहेत. भक्तीसंगीत, भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून ही संस्था जंगलात लागणारे वणवे यापासून कोणते धोके निर्माण होतात, असे वणवे रोखण्यासाठी काय करायला हवे याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य करीत असतात. ओडिशा राज्यातील किओन्झार या जिल्ह्यात हे समाजजागृतीचे कार्य त्या करीत आहेत. भजन, कीर्तन करणारा हा महिलांचा गट एका गावाहून दुसर्या गावांमधून प्रवास करीत आपल्या भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत असतात. आपल्या आजूबाजूचा निसर्ग जपणे किती महत्त्वाचे आहे, ते या महिला पटवून देत असतात. प्रमिला प्रधान यांच्यासारख्या समाजामध्ये बदल घडविणार्या महिला या खर्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, मयूरभंज जिल्ह्यात संथाली साडी विणण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्या जिल्ह्यातील ६५० हून अधिक महिलांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. "या महिला केवळ साड्या विणण्याचे कार्य करीत नसून त्यांनी याद्वारे आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमात ओडिशा राज्यात चालत असलेल्या उपक्रमांची पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून दखल घेतल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेश प्रधान यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.
कर्नाटकातील सत्तासंघर्ष तीव्र?कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार असले, तरी विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा संघर्ष जोरदार सुरू आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी शिवकुमार राज्यातील विविध मंदिरांना भेटी देऊन तेथील देवतांचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच, विविध धर्माचार्यांचे आशीर्वाद घेत आहेत. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस पक्षनेतृत्वावर दबाब वाढत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अलीकडे आठवडाभर विविध मंदिरांना भेटी देत होते. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होईल, अशी भाकिते वर्तविण्यात येत आहेत. आपली ही व्यक्तिगत आध्यात्मिक यात्रा असल्याचे डी. के. शिवकुमार म्हणत असले, तरी ते ज्या प्रभावी धर्माचार्यांना भेटत आहेत ते पाहता, त्यांचे पाठबळ आपल्यामागे उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. शिवकुमार यांनी आपल्या यात्रेत हसन जिल्ह्यातील जेनुकल सिद्धेश्वर मंदिर, कोडी मठ यांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांचे समर्थक उघडपणे ‘कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री’ अशा घोषणा देत होते. कोडी मठाच्या धर्मगुरूंच्या समवेत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. या सर्वांचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे शिवकुमार म्हणत असले, तरी ही सर्व ‘सप्टेंबर क्रांती’ची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, लोकांचा भावी मुख्यमंत्री अशी जी प्रतिमा डी. के. शिवकुमार यांची केली जात आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे नेतृत्व शिवकुमार यांच्याकडे सरकारची सूत्रे सोपविणार की, ‘जैसे थे’ स्थिती ठेवणार हे आगामी काळात दिसून येईलच.
भारत-मालदीव संबंधात लक्षणीय बदल मालदीव या हिंदी महासागरातील देशामध्ये सत्तांतर झाल्यानंतर त्या देशाने चीनला जवळ करून जी भारतविरोधी भूमिका घेतली होती, त्यामुळे उभय देशांमधील संबंध खूप ताणले गेले होते. वेळोवेळी भारताने मालदीवला अनेक बाबतीत मदत केली होती. पण, मालदीवने कृतघ्नपणा करून भारतास दूर ठेवण्याचे प्रयत्न चालविले होते. पण, त्या देशातील सरकारला आता उपरती झाली आणि उभय देशातील संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या मालदीव भेटीवर गेले होते. त्या देशाच्या ६०व्या स्वातंत्र्यदिन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान उपस्थित राहिले. या भेटीदरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले. पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्याशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. उभय देशांमधील व्यापारी, संरक्षणविषयक संबंध आणखी दृढ कसे होतील, यावर चर्चा झाली. या भेटीच्या दरम्यान मालदीवला ४ हजार, ८५० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा भारताकडून करण्यात आली. "भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून आहेत आणि ते सागराइतके सखोल आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मध्यंतरी भारतविरोधी भूमिका घेणार्या मालदीवला आपली चूक लक्षात आल्याचे या सर्व घटनांवरून दिसून येते. हिंदी महासागरात भारत हाच आपला भक्कम आधार आहे, हे मालदीवला उशिरा का होईना कळून चुकलेले दिसते, हा या सर्वांचा अर्थ!
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२