बतुमी : (FIDE Women’s World Cup 2025 Final) फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम फेरीतील कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील दुसरा डाव हा ड्रॉ राहिल्यामुळे आता विजेतेपदाचा निर्णय सोमवारी होणाऱ्या टायब्रेकर सामन्यामध्ये लागणार आहे.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावामध्ये चांगल्या सुरुवातीचा पुरेपूर फायदा उठवू न शकलेल्या दिव्याने दुसऱ्या डावामध्ये काळ्या मोहऱ्यांसह खेळूनही चांगली कामगिरी केली. यादरम्यान, अनुभवी हम्पीच्या प्रत्येक हालचालीला ती चोख प्रत्युत्तर देत होती. हम्पीने तिचा एक प्यादा गमावल्यानंतर दिव्याला अडकवून सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु या दरम्यान तिने तिचे दोन्ही उंटाचे मोहरे गमावले. यामुळे दिव्याला एका प्याद्याच्या फायद्याने पुनरागमन करण्याची संधी मिळाली. दोन्ही खेळाडूंकडून एकच चाल तीनवेळा झाल्याने नियमांनुसार ३४ चालींनंतर डाव बरोबरीत संपवला.
आता टायब्रेकरमध्ये प्रत्येकी १५ मिनिटांचे दोन डाव खेळवले जातील. त्यानंतरही बरोबरी राहिल्यास आणखी दहा मिनिटांचा डाव होईल. यानंतरही बरोबरीची कोंडी न फुटल्यास पाच मिनिटांचे आणखी दोन डाव होतील. एक खेळाडू विजेता होईपर्यंत हे चालू राहील. चीनच्या झोंग्यी टॅन आणि लेई टिंगजी यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीचा प्ले-ऑफ सामना देखील अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.