मराठमोळ्या दिव्याने रचला इतिहास! महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरली

28 Jul 2025 18:27:12


बाटुमी : (Divya Deshmukh Becomes India’s First Women’s Chess World Champion) भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने एक नवा इतिहास रचला आहे. दिव्याने एफआयडीई महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीचा पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. यासोबतच महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. अवघ्या १९व्या वर्षी तिने हा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. टायब्रेकर सामन्यात दिव्याने अतिशय हुशारीने आणि संयमाने खेळत हम्पीला हरवले.

जॉर्जियामधील बाटुमी मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या. उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. उपांत्य फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती. विजयानंतर दिव्याने "मला आता बोलणे कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरूवात आहे", अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


१९ वर्षीय दिव्या ही तिची प्रतिस्पर्धी असलेल्या अनुभवी हम्पीच्या निम्म्या वयाची होती. कोनेरू हम्पी ही ग्रँडमास्टर बनणारी भारताची पहिली महिला आहे. हम्पी ग्रँडमास्टर झाल्यापासून, फक्त दोन महिलांनीच ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. आजच्या या विजयानंतर दिव्या भारताची चौथी ग्रँडमास्टर दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. या मोठ्या विजयासह, दिव्या आता २०२६ मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तसेच तिने आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे, जो कोणत्याही बुद्धिबळपटूच्या कारकिर्दीतील एक खूप महत्त्वाचा टप्पा समजला जातो.




Powered By Sangraha 9.0