
मुंबई : गुजरातच्या राजकोट येथील आत्मीय महाविद्यालयात पाकिस्तानातून भारतात स्थलांतरीत झालेल्या १८५ निर्वासित हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. ही कुटुंबे गुजरातमधील कच्छ, मोरबी आणि राजकोट जिल्ह्यात स्थायिक आहेत. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत, या लोकांना नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)-२०१९ अंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी हर्ष संघवी म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या अशा निर्वासितांसाठी आज एक नवीन जीवन सुरू झाले आहे. ज्यांना सीएएच्या मार्फत भारतीय नागरिकत्व मिळाले ते आजपासून भारत या महान देशाचे हक्काचे नागरिक झालेत. निर्वासितांचे दुःख ऐकून अक्षरशः डोळे पाणवतात, अंगावर शहारे येतात. काही महिलांनी पाकिस्तानमधील अत्याचारांमुळे त्यांचे पती गमावले तर काहींना आपल्या जळत्या घरातून पळून जावे लागले. या लोकांनी अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे तिथे घालवली. या सर्वांच्या सहनशक्तीला खरच प्रणाम करावासा वाटतो.
यावेळी उपस्थित निर्वासितांपैकी काहींनी आपले मनोगत व्यक्त केले. काहींना भारतीय कुटुंबाचा भाग बनल्यामुळे आनंद झाला. अनेकांनी त्यांना भारतात सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. काहींनी तर आता आपण भारतीय म्हणून ओळख सांगणार याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.