कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

27 Jul 2025 20:57:24

विरार, वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या दोन टीम तयार करुन धडक मोहिम राबविण्यात आली.

या धडक मोहिमेत चिंचोटी-कामण भागातील काही दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये बी.ए.एम.एस. आणि बी.एच.एम.एस. डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी केली असता जे दवाखाने महापालिकेकडे नोंदणीकृत नाहीत अशा दवाखान्यांत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा दवाखान्यांतील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे करण्यात येते याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. अशा डॉक्टरांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रमाणपत्र घेण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर असे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर इ. महापालिका कार्यक्षेत्रात आढळल्यास जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

धडक मोहिमेअंतर्गत २ बोगस डॉक्टरांवर नायगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कुमार यादव, परमहंस क्लिनिक, इडी इस्टेट समोर, सागपाडा, चिंचोटी, कामण, वसई पूर्व आणि लिटन मृत्तुजोय बिस्वास, शॉप नं.२, चिंचोटी, भजनलाल डेअरी हॉटेल, पो. कामण, वसई पूर्व अशी बोगस डॉक्टरांची नावे आहेत. अशा अवैध वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी धाडसत्र असेच सुरु राहणार असून वसई विरार महापालिका कार्यक्षेत्र 'बोगस डॉक्टर मुक्त' करण्याचे आवाहन स्वीकारुन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत राहणार असून अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांपासून सावध रहा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच असे बोगस डॉक्टर आपल्या कार्यक्षेत्रात असल्यास त्याबाबत वसई विरार महापालिका मुख्यालय, वैद्यकीय आरोग्य विभाग, ७वा मजला, म्हाडा कॉलनी रोड, विरार (प.) येथे संपर्क साधावा. आपण दिलेल्या माहितीबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0