
सातारा : "बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर ही स्थळं वीरशैव लिंगायत समाजासाठी श्रद्धास्थान आहेत. शक्ती देवीची भक्ती आणि बसवेश्वर, सिद्धराम या शिवशरणांबद्दल असलेली निष्ठा हे दर्शवते की वीरशैव लिंगायत हिंदूच आहेत," असे स्पष्ट प्रतिपादन महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर) यांनी केले.
हिंदू वीरशैव लिंगायत मंच, सातारा यांच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त २२ जुलै रोजी आयोजित समाज मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित समाजबांधवांना आशीर्वचनही दिले.
कार्यक्रमात प्राचार्य गजानन धरणे (सोलापूर) आणि हेमंत हरहरे (पुणे) यांनी समाजाच्या वैचारिक प्रबोधनासाठी मार्गदर्शन केले. समाजावर होणाऱ्या वैचारिक व सांस्कृतिक आक्रमणाचा ठामपणे विरोध करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
दैनिक मुंबई तरुण भारत वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘समाजसुधारक जगत्योती महात्मा बसवेश्वर’ या विशेषांकाचेही यावेळी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात महालिंग स्वामी (कोरेगाव) व भारत शेट बारवडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महिला भजनी मंडळाच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपासाहेब कोरे, दिनेश जंगम, महेश स्वामी, महेंद्र बाजारे, बापूसाहेब चौकवले, स्वप्नील सातपुते, सोमनाथ स्वामी, विजय गाडवे, विजय फडके, डॉ. सुजित जंगम आणि सर्व वीरशैव लिंगायत समाजबांधव यांनी मेहनत घेतली.