
सध्या बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी नेत्रदीपक म्हणावी अशीच आहे. भारतीय पुरुष असो वा महिला खेळाडू असो, दोघेही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘फिडे महिला विश्वचषक स्पर्धे’तही भारतीय महिला खेळाडूंची कामगिरी कौस्तुकास्पद अशीच! या स्पर्धेचा आणि भारतीय महिला खेळाडूंच्या प्रगतीचा घेतलेला आढावा...बुद्धिबळाला सीमा नसतात, ही जगभरातील लाखो लोक बोलणारी भाषा आहे. आज, आपण त्या खेळाचा सन्मान करतो, तो आपल्या सर्वांनाच एकत्र आणतो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! दि. २० जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन’ जगभरात साजरा झाला. त्याप्रसंगी बुद्धिबळप्रेमींनी एकमेकांस दिलेल्या या शुभेच्छा होत्या. या शुभेच्छांचे आदानप्रदान होत होते, त्याच सुमारास भारतीयांना अजून एक शुभेच्छा देण्याची पर्वणी मिळाली. ती पर्वणी आणली, कोनेरु हम्पी आणि दिव्या देशमुख या भारतीय युवतींनी.
जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या ’फीडे महिला विश्वचषक २०२५’मधील उपांत्य फेरीच्या सामन्यात, भारताच्या दिव्या देशमुखने उत्कृष्ट कामगिरी करत, चीनच्या टॅन झोंगी हिला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. भारतीयांना आनंद देणारी ती पहिली युवती ठरली. दिव्या पाठोपाठ कोनेरु हम्पी सुद्धा, अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाली. अशा तर्हेने अंतिम सामन्यातील भारतीयांचे स्थान पक्के झाले आहे .
देशाचा पहिल्या ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदचा असा विश्वास आहे की, ज्या पिढीच्या जडणघडणीमध्ये त्याने मदत केली अशी सध्याची भारतीय खेळाडूंची पिढी, महत्त्वाच्या संधींचा फायदा घेत लक्षणीय कामगिरी करत आहे. "इतया वर्षांपासून मी सर्वोत्तम-१०० खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय खेळाडू होतो. पण, आता कदाचित सहा किंवा सात खेळाडू भारतीय असतील,” असे विश्वनाथन आनंदने काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते. दिवसेंदिवस ही संख्या वाढतानाही दिसत आहे.
जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या ’फीडे महिला विश्वचषक २०२५’ मध्ये सहभागी झालेल्या भारतीय युवतींची संख्या बघता, ते चित्र आपल्याला आनंदच देईल. चीनच्या दिग्गज खेळाडूंना या स्पर्धेत पराभूत करत, ’फीडे महिला विश्वचषक स्पर्धे’तील अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलेल्या दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पीने चीनच्या टींग जे लई हिला पराभूत केले, तर दिव्या देशमुखने चीनची माजी विश्वविजेती झूंग ली ताय हिला हरवले. दिव्याने दहापैकी तीन खेळाडूंना हरवत, सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. आता या दोघींतील अंतिम लढतीकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या होत्या.
’फीडे महिला विश्वचषक २०२५’ स्पर्धेतील विजेतीला ५० हजार डॉलर्स, तर उपविजेतेपदासाठी ३५ हजार डॉलर्स मिळणार होते. अनुभव आणि जोश यांच्यातील या संघर्षात हम्पी कोनेरुचा अनुभव कामाला आल्यस हंपीला ५० हजार डॉलर्स, तर दिव्याला ३५ हजार डॉलर्सवर समाधान मानावे लागले असतेे. मात्र सगळ्यांना आश्चर्यचकित करणार्या सळसळत्या रक्ताच्या दिव्याने, अनुभवाएवढाच जोशही यशस्वी ठरल्याचे सिद्ध केले आणि हम्पीला मागे सारत ५० हजार डॉलर्स पटकावले, तर हम्पीला ३५ हजार डॉलर्सवर समाधान मानवे लागले.
या आर्थिक कमाईबरोबरच अखिल भारतीय सामन्यातील विजयामुळे पुढील वर्षी होणार्या फीडे महिला उमेदवार (कॅण्डिडेट) स्पर्धेत, भारताचे स्थान निश्चित झाले आहे. या स्पर्धेत विजेतीला जागतिक अजिंयपद स्पर्धेसाठी, चीनच्या जू वेन्जुनला आव्हान देण्याचा अधिकार मिळाला आहे.
या स्पर्धेतील एका उपांत्यपूर्व फेरीत भारताची वैशाली रमेशबाबू, चीनकडून १.५ विरुद्ध ०.५ अशा फरकाने पराभूत झाली, तर भारताचीच हरिका द्रोणावली भारताच्याच दिव्या देशमुखकडून ३ विरुद्ध १ अशा फरकाने पराभूत झाली. दुसर्या एका उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या हम्पीने युसीन सोंगला पराभूत करून, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या एका स्पर्धेत हम्पीने ली टींगजीला ५ विरुद्ध ३ असे हरवले, तर दुसर्या उपांत्य फेरीमध्ये टॅन झौंग्यीला दिव्या देशमुखने १.५ विरुद्ध ०.५ असे पराभूत केले. अशाप्रकारे भारतीय युवती अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाल्याने, अंतिम सामन्याला भारत विरुद्ध भारत असे स्वरूप प्राप्त झाले. अशा भारत विरुद्ध भारत सामन्यात दिव्या देशमुख या एका भारतीयानेच, कोनेरु हम्पी या दुसर्या भारतीयाला मागे टाकले.
या स्पर्धेच्या अनुषंगाने, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा संदर्भ आपण पाहू. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने दि. १२ डिसेंबर रोजी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा ठराव एकमताने मंजूर केला होता. हा ठराव आर्मेनियाने मांडला होता आणि इतर ५२ देशांनी त्याला पाठिंबाही देऊ केला होता. तेव्हापासून दि. २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. १९२४ साली पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली ती याच दिवशी. हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना ‘युनेस्को’ने मांडली होती आणि फिडेने त्याची स्थापना केल्यानंतर, १९६६ सालापासून तो आजतागयत तसाच साजरा केला जात आहे.
जागतिक बुद्धिबळ दिनाच्या ठरावाचा मसुदा सादर करतेवेळी आर्मेनियाच्या प्रतिनिधीने निरीक्षण केले होते की, हा खेळ राष्ट्रांच्या सीमा ओलांडू शकतो आणि वांशिक, राजकीय आणि सामाजिक अडथळेही दूर करू शकतो. त्यांनी पुढे सांगितले होते की, आर्मेनियाने शाळांमध्ये बुद्धिबळ हा शैक्षणिक विषय म्हणून स्वीकारलेला आहे आणि सध्या जगात दरडोई बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर्सची संख्या सर्वाधिक आहे.
अशा या जगप्रसिद्ध खेळात भारतही आता आघाडीवर असल्याचे आपण बघत आहोत. भारतीय शालेय विद्यार्थीही, बुद्धिबळात रस घेताना दिसत आहेत. विद्यार्थी बुद्धिबळात रममाण होऊन त्यात त्यांना प्राविण्य मिळवण्यात, त्यांच्या पालकांचा विशेष सहभाग असल्याचे आज आपण अनुभवत आहोत.
या संदर्भात आपण कोनेरु हम्पीचेच उदाहरण पाहू. राष्ट्रीय स्तरावरील माजी बुद्धिबळ खेळाडू आणि दोनवेळा राज्यस्तरीय विजेते राहिलेल्या कोनेरु अशोक यांनी, आपल्या मुलीचे नाव ‘हम्पी’ असे ठेवले. त्यांना आशा होती की, त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलीने साकार करावे. ’हम्पी’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘चॅम्पियन’ असा आहे. रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या कोनेरु अशोक यांनी नोकरी सोडून, हम्पीला अगदी लहानपणापासूनच खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दि. ३१ मार्च १९८७ रोजी वडील कोनेरु अशोक आणि आई कोनेरु लता यांच्या पोटी आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे जन्मलेली हम्पी, अवघ्या पाच वर्षांची असल्यापासूनच बुद्धिबळाचे डावपेच शिकू लागली. तिचे वडील तिला अनेक मुलांबरोबर खेळवून, मुलीची पारख करू लागले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी म्हणजेच १९९६ साली हम्पी राष्ट्रीय विजेती झाली. तिला पुढे प्रगती करायची असेल, तर तिचे ’इलो’ रेटिंग वाढवणे गरजेचे होते, हे हम्पीच्या वडीलांनी हेरले. त्यासाठी मात्र तिला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक होते. अर्थातच या सगळ्यासाठी येणारा खर्च, विशेषतः प्रवासाचा खर्च हा त्यांच्या आवायाबाहेरचा होता. म्हणून हम्पीने त्यावेळी ’बँक ऑफ बडोदा’चे प्रायोजकत्व स्वीकारले परंतु, बँकेकडून मिळणारी रक्कम हीसुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवासाला फारशी पुरेशी नव्हती. त्यामुळे हम्पीने आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी २००६ साली ’ओएनजीसी’ या सरकारी कंपनीत नोकरी पत्करली, जेणेकरून तिची प्रवास खर्चाची चिंता मिटेल आणि ते तिच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. पुढे २०१४ साली हम्पीने दसारी अन्वेश यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि २०१७ साली या दाम्पत्याला आहाना नावाचे गोंडस बाळही झाले. प्रसूतीनंतर ती खेळाकडे परतली तेव्हा, सातत्याने मोठे पराभवच तिच्या वाट्याला आले. ती ‘ऑलिम्पियाड’, ‘लासिकल जागतिक अजिंक्यपद’ आणि ‘जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद’ अशा स्पर्धांमध्ये हरली. या पराभवांची सल तिला सतावत होती. त्यानंतर अखेर २०१९ साली मॉस्को येथे झालेल्या ’वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत’ तिने जागतिक विजेतेपदाला गवसणी घालत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. या स्पर्धेनंतर तिच्या असे लक्षात आले की, वेगवान बुद्धिबळ या प्रकारांसाठी ती बनलेली नसून, आता तिचे मोठे लक्ष्य लासिकल बुद्धिबळाची जागतिक विजेती होणे आहे.
आता दिव्या देशमुखबद्दल थोडयात जाणून घेऊया. दि. ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूर येथील एका मराठी कुटुंबात जितेंद्र आणि नम्रता देशमुख या डॉक्टर दांपत्याच्या पोटी दिव्याचा जन्म झाला. दिव्याचे सुरुवातीचे शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर येथे झाले. या नागपूर कन्येला ‘महिला ग्रॅण्डमास्टर’ आणि ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ या पदव्या मिळाल्या आहेत. तिने ’बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. दिव्याने ’आशियाई अजिंयपद’, ’जागतिक ज्युनियर अजिंयपद’ तसेच, ’जागतिक युवा अजिंयपद’ स्पर्धेतही अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन पंधरवडा आगामी काळात जेव्हा जेव्हा येईल, तेव्हा भारतीय युवतींनी मिळवलेले हे यश चिरंतन स्मरणात राहील. ग्रॅण्डमास्टर आर प्रज्ञानंदाने दि. २ फेब्रुवारी रोजी नेदरलॅण्ड्समध्ये झालेल्या रोमहर्षक टाय-ब्रेकमध्ये जागतिक विजेता डी गुकेशचा पराभव करून टाटा स्टील मास्टर्स २०२५चे जेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावत आर प्रज्ञानंदने इतिहास घडवला. २००६ साली विश्वनाथन आनंदनंतर ’टाटा स्टील चेस मास्टर्स’ जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. आर प्रज्ञानंद आणि डी गुकेश यांच्यातला तामिळनाडू विरुद्ध तामिळनाडू असाही एक रोमांचक सामना, भारतीय बुद्धिबळप्रेमींना बघिता आला. तो सामना आपल्या सर्वांना आठवत असेलच. जर स्पर्धा सोमवारी टाय-ब्रेकमध्ये गेली, तर असाच भारत विरुद्ध भारत किंवा नागपूर विरुद्ध विजयवाडा असा सामना आपण कोनेरु हम्पी विरुद्ध दिव्या देशमुख असा बघणार आहोत. यांच्यातील विजेती उपविजेती कोणीही असली, तरी फीडेच्या लेखी भारताचेच नाव कोरलेले जाणार आहे, हे नक्की! आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन पंधरवडा आगामी काळात जेव्हा येईल, तेव्हा भारतीय युवतींनी मिळवलेले हे यश चिरंतन स्मरणात राहील.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४