मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात ७ ते ८ वाहने एकमेकांना धडकली जखमींवर खोपोलीतील ग्रामीण रुग्णालय उपचार

26 Jul 2025 16:56:54

मुंबई : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली येथे बोरघाटात शनिवार,दि.२६ रोजी दुपारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली. या अपघातात ७ ते ८ वाहने एकमेकांवर आदळली असून ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.

लोणावळा-खंडाळा घाटातून खाली उतरताना दत्ता फूडमॉलजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने प्रचंड वेगात इतर वाहनांना धडक दिली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात अनेक गाड्यांचा चुराडा झाला. यातील जखमींपैकी २० ते २२ जणांना पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी ग्रामपंचायतमधील रुग्णवाहिका मागविण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांमुळे रस्ता अडवला गेल्याने ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही काळ पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला. महामार्ग पोलीस क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

Powered By Sangraha 9.0