लोककला, लोकपरंपरा हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. काळाच्या ओघात आपली ही कला मागे तर पडली नाहीच, पण आजच्या पिढीतील तरुणांनासुद्धा या कलेने आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं. लोककलेच्या परंपरेशी केवळ नातं सांगणारीच नव्हे, तर तिचा मूळ गाभा लोकांसमोर मांडण्याचे काम ‘विश्व लोककला मंचा’च्या माध्यमातून केले जातेे. आजच्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त सादर होणार्या लोककलेच्या विशेष कार्यक्रमानिमित्त या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
सर्व लोककलेसाठी व लोककला सर्वांसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘विश्व लोककला मंचा’ची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील विविध लोककलांचा अभ्यास करून, त्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारे लोककलेचे सादरीकरण केले जाते. परंतु, लोककलेचा जो मूळ गाभा आहे, जी मूळ बैठक आहे ती लोकांसमोर ‘लाँग अॅण्ड शॉर्ट व्हिडिओ फॉर्म’च्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न ‘विश्व लोककला मंचा’ नेटाने करीत आहे. मागील दीड वर्षांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या लोककलांविषयी माहिती देणारे माहितीपर व्हिडिओ समाजमाध्यमांवर या संस्थेने तयार केले.
‘विश्व लोककला मंचा’विषयी प्रारंभीच ही माहिती देण्याचे कारण म्हणजे, दि. 26 जुलै हा दिवस देशभर आपण ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. यानिमित्ताने ‘विश्व लोककला मंचा’चे कलाकार लोककलेचा जागर करणार आहेत. ‘अंजली साखरे वेलियंट फेम आयकॉन फाऊंडेशन’ आयोजित ‘कारगिल विजय दिना’च्या निमित्ताने ‘विश्व लोककला मंचा’च्या माध्यमातून महाराष्ट्राचा पारंपरिक गोंधळ सादर करणार आहेत. मुंबईतील भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे सायंकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना ‘विश्व लोककला मंचा’च्या मुख्य समितीचे सदस्य सूरज खरटमल म्हणाले की, “गोंधळ ही महाराष्ट्रातील लोककलांपैकी आद्य लोककला मानली जाते. साडेतीन शक्तिपीठांची आराधना करण्यासाठी ‘गोंधळ’ घातला जातो. आपल्या लोककला इतक्या लवचिक आहेत की, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण वेगवगेळ्या गोष्टींवर मार्मिक भाष्य करू शकतो. त्यामुळे या कलेच्या माध्यमातून आम्ही ‘कारगिल विजय दिवसा’चे महत्त्व, हे युद्ध कसं घडलं, हे लोकांना सांगणार आहोत. त्याचबरोबर सैनिकांचे आयुष्य कसे आहे, सैनिक कसा घडतो, तो आपल्या देशाची सीमा कशी सुरक्षित ठेवतो, या सगळ्यांचा संगम आम्ही सादर करणार आहोत. हा विषय जरी आधुनिक असला, तरी गोंधळाच्या पारंपरिक मांडलेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे.”
‘गोंधळ’ या लोककलेच्या प्रकारावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, “गोंधळ म्हटलं की सुरुवातीला संबळचा ठेका येतो, मग सूत्रधाराचे आगमन होते, मग गण सदर होतो, देव-देवतांचे आगमन होते, त्यानंतर ‘गोंधळ’ नेमका कशासाठी घातला जातो, याबद्दलची माहिती दिली जाते. साडेतीन शक्तिपीठांची महती या गोंधळात सांगितली जाते व शेवटी जोगवा मागून या गोंधळाची सांगता केली जाते.”
‘विश्व लोककला मंचा’च्या माध्यमातून ‘लोककला दर्शन’ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोककलांचे सादरीकरण ते करतात. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, सहकारी तत्त्वावर चालणारी ही संस्था असून, महाराष्ट्रातील अनेक युवा कलावंत या संस्थेशी जोडलेले आहेत.
या संस्थेत काम करत असताना, कलाकार कुठल्याही प्रकारे आर्थिक गोष्टींचा विचार न करता, महाराष्ट्राची, भारताची लोककला ही सर्वदूर, सातासमुद्रापार पोहोचावी, याचा विचार करतात. मात्र, लोककलेची सेवा घडत असताना, दुसर्या बाजूला या माध्यमातून कलाकारांचा उदरनिर्वाहसुद्धा होतो. यथायोग्य मानधनसुद्धा कलाकारांना दिले जाते. त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला काय शिकता येईल, कुठल्या नवीन गोष्टी आत्मसात करता येतील, हा विचार ठेवून हे कलाकार काम करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे पारंपरिक लोककलावंत आहेत, ज्यांना लोककलेचा हा वारसा आहे, परंपराकाठिण्य आहे, अशा लोककलावंतांना मदत करता येईल, हा विचार घेऊन सादरीकरण केले जाते. त्याचबरोबर सर्वार्थाने या लोककलाकारांना साक्षर करण्याचे काम ही संस्था करत आहे.
संस्थेतील कलाकार आपले अनुभव सांगताना म्हणतात की, “लोककला सादर करतानाचा अनुभव अवर्णनीय असतो. आतापर्यंत जी सादरीकरणं झाली आहेत, त्यामध्ये सर्व वयोगटातील लोकं सहभागी झाले आहेत, आम्हाला अनेकदा ‘वन्स मोअर’ही मिळाला आहे. त्याचबरोबर सगळे प्रेक्षक गाण्यांवर थिरकतात, मजा करतात, हीच लोककलेची ताकद आहे. प्रेक्षकांना स्फुरण चढते, वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य पसरलेलं असतं. प्रेक्षकांच्या मनामध्ये एक नैसर्गिक कुतूहल असतं, त्यामुळे कार्यक्रमानंतर ते आमची विचारपूस करतात. त्यांना सादरीकरणाविषयी जाणून घ्यायचं असतं. सोबतच आम्हाला या प्रक्रियेमध्ये पुढचे कार्यक्रमसुद्धा मिळतात.”
सूरज खरटमल, जगदीश कण्ण्म, मंगेश शिंदे, निभा झेमसे, निखिल घोंगडे हे या संस्थेच्या मुख्य समितीची धुरा सांभाळत असून, ही संस्था सहकारी तत्त्वावर कार्यरत आहे. महाराष्ट्रातील लोककला ही प्रवाही आहे. कालौघात या प्रवाहामध्ये अनेक नवनवीन गोष्टींचा समावेशही झाला. या कलेचा मूळ गाभा न बदलता, त्यामध्ये अनेकविध बदलही स्वीकारले गेले. महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे मागील अनेक पिढ्यांपासून लोककलेचा हा समृद्ध वारसा पिढीजात चालत आलेला आहे.
संस्था म्हणून लोककलेचा जो मूळ गाभा आहे, तो कसा टिकवता येईल, हा विचार ठेवून ‘विश्व लोककला मंच’ कार्यप्रवण आहे. कलेचं एक व्यावहारिक अंगसुद्धा असतं. मध्यंतरीच्या काळात त्या अर्थाने लोककलेला बरे दिवस नव्हते. परंतु, आजघडीला वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून लोककलेचा विचार लोकांसमोर येत असताना, त्याची व्यावहारिक बाजू सक्षम होताना दिसते. यात महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘विश्व लोककला मंच’ व त्यातील कलाकारांना लोककलेचा, संस्कृतीचा जो मूळ गाभा आहे, तो जपायचा आहे. कलेची व्यावहारिक बाजू, गणिते आणि संस्कृतीच्या संरचनेतील प्रवाह निरंतर बदलत जातील, मात्र संस्कृतीचा, परंपरेचा मूळ विचार हरवू नये, यासाठी कार्यरत असणारे कलाकार हाच खरा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
9967826983