कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातून पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा
२६ जुलै रोजी 'कारगिल विजय दिन' साजरा केला जातो या दिवशी आपण कारगिल संघर्षातील आपल्या विजयाचे स्मरण करतो. या लढ्याचे केंद्रबिंदू राहिलेले भारतीय सैन्य आणि त्याच्या पराक्रमाचे नेहमीच कौतुक होते. हा संघर्ष प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (LoC) झाला होता. शत्रूने भारतीय हद्दीत घुसखोरी करून भूभाग व्यापला होता आणि त्याला जमिनीवरच्या कारवायांद्वारे आणि आकाशातून हल्ले करून मागे हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे साहजिकच, या संघर्षाचा मुख्य कथानक थेट लष्करी कारवायांभोवती आणि काही प्रमाणात हवाई दलाच्या भूमिकेभोवती फिरतो. मात्र, सामान्य जनतेशी संवाद साधताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की अनेकांना एक गोष्ट ठाऊक नव्हती की या संघर्षात भारतीय नौदलानेही एक महत्त्वाची भूमिका बजावली होती.भूआधारित, सागरी आणि हवाई अशा तीन प्रकारच्या लष्करी शक्तींमध्ये हवाई दल सर्वात जलद कारवाई करू शकते, तर नौदल त्यानंतर येते. काही नौदल जहाजे कायमच समुद्रात कार्यरत असतात. भारतीय नौदलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, युद्धाच्या वेळेशिवायही अगदी शांततेच्या काळातही ती आपली कारवाई राष्ट्रीय सीमांपुरती मर्यादित ठेवावी लागते असे नाही. आंतरराष्ट्रीय जलसीमांमध्ये कार्यरत राहून ती केव्हा ही युद्धस्थितीकडे वळू शकते. हाच लवचिकतेचा गुणधर्म कारगिल संघर्षात भारतीय नौदलाने प्रभावीपणे वापरला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यावर, भारतीय नौदलाने आपले वार्षिक सराव पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे अरबी समुद्रात हलवले. त्यामुळे नौदलाने आपल्या पूर्व कमांडमधील युद्धनौकांचा ताफा अरबी समुद्रात दाखल केला. संपूर्ण देश, माध्यमे आणि आंतरराष्ट्रीय लक्ष जेव्हा कारगिलच्या पर्वतरांगांवर केंद्रित होते. तेव्हा भारतीय नौदल 'ऑपरेशन तलवार' च्या माध्यमातून कामाला लागले होते.
'ऑपरेशन तलवार' अंतर्गत तटरक्षण बळकट करणे, तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग आणि पोलिस यांच्यासोबत संयुक्त गस्त घालणे अशा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या. युद्धनौका, पाणबुड्या आणि शस्त्रांनी सज्ज विमाने यांची सज्जता हे भारताच्या गंभीर मनोवृत्तीचे स्पष्ट संकेत होते. शत्रू नौदलाच्या हालचालींची माहिती घेणे, विशेषतः गुजरात-सौराष्ट्र किनारपट्टीवरील नजर ठेवणे, हेही महत्त्वाचे कार्य नौदलाने हाती घेतले. समुद्री टोह घेणाऱ्या विमाने (Maritime Reconnaissance Aircraft) यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरली. उच्च मूल्य असलेल्या भारतीय व्यापारी जहाजांचे संरक्षण आणि मार्गदर्शन केले गेले. 'बॉम्बे हाय'च्या सुरक्षेसाठी नौदल आणि हवाई दलाने संयुक्त पद्धतीने नियोजन केले.
कारगिलमधील लढ्याचा जोर वाढत असतानाच समुद्रातील नौदल कारवायाही तीव्र होत होत्या. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आक्रमक गस्त सुरू केल्या, गनबोट डिप्लोमसी'चे एक उदाहरण म्हणून, एका टप्प्यावर ३० हून अधिक युद्धनौका कराची बंदराच्या केवळ १३ नॉटिकल मैल अंतरावर (फक्त २४ किमी दूर), म्हणजे पाकिस्तानच्या सागरी सीमेला अगदी भिडलेल्या अवस्थेत तैनात करण्यात आल्या. 'Saudi Gazette' या सौदी अरबच्या वर्तमानपत्राने याचा उल्लेख करताना भारतीय नौदलाने सागरी नाकेबंदीची तयारी केल्याचे म्हटले. हे पाहून पाकिस्तान नौदलानेही आपली टोही कारवायांची सुरुवात केली. पण जेव्हा त्यांना भारतीय युद्धनौकांचा खरा उद्देश आणि ताकद लक्षात आली, तेव्हा ते हादरले. ही काही नौदलाची सामान्य कवायत नव्हती, तर एक स्पष्ट इशारा होता युद्ध सुरू झाले, तर भारत समुद्रातून विनाश घडवू शकतो. पाकिस्तान नौदलाने तात्काळ संरक्षणात्मक भूमिका स्वीकारली. त्यांच्या जहाजांना भारतीय नौकांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या तेल वाहून नेणाऱ्या टैंकर्स आणि मुख्य युद्धनौकांना कराचीहून मकरान किनाऱ्याकडे हलवले गेले, जेणेकरून भारतीय नौदलाच्या संभाव्य हल्ल्यांपासून त्यांना वाचवता येईल. कराचीत उरलेल्या पाकिस्तान नौदलाच्या युद्धनौकांना बंदरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले, कारण भारतीय जहाजांशी थेट टक्कर देण्याची शक्यता टाळायची होती. हा भारतासाठी एक मोठा मानसिक विजय होता. पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांकडून त्याला मदत पोहोचवण्याचे प्रयत्नही याच काळात उधळून लावण्यात आले. अशाच एका कारवाईत भारतीय नौदलाने उत्तर कोरियाच्या मालवाहू जहाजाला अडवले. या जहाजावर क्षेपणास्त्रांच्या सुटन्या भागांचे साठवण (बहुधा चीनकडून) असल्याचा संशय होता.
त्याच वेळी, नौदलाचे कारवाया केवळ समुद्रापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. नियंत्रणरेषेवर नौदलाच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विमानांनी हवाई मोहिमांना महत्त्वपूर्ण पाठबळ दिले. विशेष जलसर्वेक्षण पथके नौदलाने घेट लष्कराच्या तोफखाना विभागाबरोबर समन्वयाने कार्यरत केली. जेणेकरून शत्रूच्या तोफखान्याच्या स्थानांची अचूक माहिती मिळवता येईल. मोठ्या चित्रात पाहिल्यास, भारतीय नौदलाने थेट युद्धात सहभागी न होता केवळ 'ऑपरेशन तलवार' च्या माध्यमातून पाकिस्तानला अक्षरशः समुद्रातून गाठले. अघोषित सागरी नाकेबंदीची स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानची बहुतेक आयात समुद्रामार्गेच होत असल्याने, त्याच्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट होत गेला. प्रश्न 'कथी'चा होता, 'का' चा नव्हे. भारतीय नौदल समुद्री लढाईसाठी पूर्ण सज्ज होते आणि या आघाडीवर त्याला स्पष्ट सरशी होती. कारगिलमध्ये उंच हिमालयात पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव होत असताना, संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. पाक पंतप्रधान नवाज शरीफ, एकप्रकारे अडचणीत सापडून, शांततेची याचना करू लागले. नंतर त्यांनी स्वतः कबूल केले की, जर पूर्ण युद्ध झाले असते तर पाकिस्तानकडे फक्त ६ दिवस पुरेल इतके इंधन उरले होते.
'ऑपरेशन तलवार ही कारगिल संघर्षात प्रभावी दबावयुक्त मुत्सद्देगिरी (coercive diplomacy) यशस्वी ठरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. संकटाच्या काळात हवाई आणि सागरी शक्तीची निर्णायक भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली. दुर्दैवाने, आपले धोरणनिमति यातील बरेचसे धडे पुढच्या काही वर्षांत विसरून गेले विशेषतः 'ऑपरेशन पराक्रम'च्या काळात. आपले हवाई आणि नौदल युद्धप्लॅटफॉर्म्स ही लवचिकता, मारकता आणि प्रदीर्घ पोहोच यांचे अद्वितीय मिश्रण असलेली शक्ती आहेत. त्यांच्याद्वारे आपण प्रतिकार, दबाव किंवा शत्रूला झुकवणे ही सर्व उद्दिष्टे साध्य करू शकतो. कारगिलमध्ये हे सिद्ध झाले, आणि अगदी अलीकडे 'ऑपरेशन सिंदूर'मध्येही भारतीय नौदल योग्य वेळी कारवाईसाठी सज्ज होते, हे पुन्हा स्पष्ट झाले.
आज कारगिल विजयाच्या २६ वर्षांनंतर आपल्या सागरी सीमांवरील आव्हाने अधिकच वाढली आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या नौदलांनी आपली क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अरबी समुद्रात चीनच्या नौदलाची उपस्थिती आता वारंवार दिसते. जिबूतीतील त्यांचा नौसैनिक तळ आणि ग्वादर बंदराचा संभाव्य वापर यामुळे भारतावर चीनी नौदलाचा धोका आणि संकट गंभीर रित्या वाढले आहे. याला तोंड देण्यासाठी भारताने आपल्या नौदलाची पृष्ठभाग, आकाश आणि पाण्याखालची (subsurface) ही तीनही क्षेत्रांतील ताकद मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. आपण देश म्हणून आणि
विशेषतः धोरणनिर्मात आणि सामरिक अभ्यासकांनी 'सागरी अंधत्वातून बाहेर पडण्याची गरज आहे. नौदलाची क्षमता निर्माण करणे खर्चिक आहे हे खरे, पण ते टाळण्याचा पर्याय नाही. देशाने नौदलाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी द्यायलाच हवा.
या कारगिल विजय दिनी भारतीय नौदलाने केलेल्या या शांत, पण महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे 'ऑपरेशन तलवार'मध्ये सहभागी असलेल्या सर्व नौदल अधिकाऱ्यांना आणि खलाशांना योग्य मान्यता ठरेल. मात्र, ही केवळ स्मरणयात्रा नसावी तर पुढील धोरणांसाठी ती एक स्पष्ट दिशा असावी. कारगिलमधील पर्वतरांगांइतकाच महत्त्वाचा होता अरबी समुद्रातील दबाव ही गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावी लागेल. भारताची सागरी क्षमता ही केवळ युद्धाच्या वेळी नव्हे, तर शांततेच्या काळातही निर्णायक ठरते. 'ऑपरेशन तलवार है एक स्मरणिकेप्रमाणे असायला हवे -की सशक्त नौदल ही राष्ट्रीय सुरक्षेची अपरिहार्य गरज आहे. जेव्हा बंदुकीची गोळीही न सुटता शत्रू माघार घेतो, तेव्हा ती राष्ट्रशक्तीची सर्वोच्च अभिव्यक्ती ठरते. आज जेव्हा सागरी आव्हाने अधिक गुंतागुंतीची आणि बहुआयामी होत चालली आहेत, तेव्हा ही सत्यता विसरणे परवडणारे नाही. मजबूत नौदल ही 'पर्याय' नसून 'अटळ आवश्यकता' आहे आणि ते ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे.
- ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित (निवृत्त)