
पाकिस्तानच्या पंजाबी सत्ताधार्यांनी गेली कित्येक वर्षे बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडले. त्याबदल्यात बलुच यांना काहीही मिळाले नाही. त्यातूनच स्वतंत्र बलुचिस्तानच्या विचाराचा जन्म झाला. या विचाराची पुढे चळवळ झाली आणि या चळवळीला आता स्थानिक पाठिंबाही मिळू लागला. त्यातूनच ‘बीएलएफ’ने ‘ऑपरेशन बाम’ राबविले. ‘ऑपरेशन बाम’ आणि त्याच्या सांभाव्य परिणामांचा घेतलेला आढावा...पहलगाम हल्ल्यानंतर संबंधित जबाबदार संघटनेला दि. १९ जुलै रोजी जागतिक स्तरावर दहशतवादी घोषित करणे, हा केवळ एक मुत्सद्दी विजय नाही तर, भारताच्या बदललेल्या सुरक्षाविषयक धोरणाचे प्रतीक आहे. शत्रूवर केवळ लष्करी नव्हे, तर राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या माध्यमातूनही विजय मिळवता येतो, हेच भारताने यातून दाखवून दिले आहे.
पाकिस्तान : अंतर्गत हिंसाचाराचा उद्रेकपाकिस्तानमध्ये अंतर्गत हिंसाचाराचा आलेख चढता आहे. २०२५ मध्ये दि. १५ जुलै रोजीपर्यंत झालेल्या ५५० दहशतवादी हल्ल्यांमध्ये, एकूण एक हजार, ८७२ व्यक्तींना जीव गमवावा लागला. यामध्ये ३३६ सामान्य नागरिक, ६०९ पाकिस्तानी सैनिक आणि ९२७ बलुच स्वातंत्र्य सैनिकांंचा समावेश आहे. हे आकडे स्पष्ट दर्शवतात की, पाकिस्तान आज विद्रोह आणि राज्यविरोधी चळवळींच्या संकटात अडकला आहे.
संघर्षातील रणनीतीत महत्त्वपूर्ण बदल
दि. ९ ते दि. ११ जुलै दरम्यान पार पडलेले ‘ऑपरेशन बाम’, हे पाकिस्तानच्या लष्कर आणि गुप्तचर संस्थांवर केलेले पूर्वनियोजित आक्रमण होते. ही कारवाई स्थानिक नेटवर्कच्या सहकार्याने अधिक प्रभावी झाली. ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रण्ट’ अर्थात ‘बीएलएफ’ने आपल्या लढण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यांनी आता योजनाबद्ध आणि विशिष्ट उद्दिष्टे ठेवूनच हल्ल्यांना सुरुवात केली आहे. त्यांची सध्याची आक्रमक कारवाई, पाकिस्तान सैन्य आणि ‘आयएसआय’च्या विरोधात होती.
‘बीएलएफ’ने ‘ऑपरेशन बाम’ हे ऐतिहासिक यश असल्याचे जाहीर केलेे. ही मोहीम बलुचिस्तानमधील पहिलीच संपूर्ण प्रांतव्यापी होती. यामध्ये ८४ समन्वित हल्ले करण्यात आले. या कारवायांच्या माध्यमातून, बलुचिस्तानवरील पाकिस्तानच्या नियंत्रणाला आव्हान देण्यात आले आहे.
लष्करी विजय आणि आर्थिक अडथळे
‘बाम’ या बलुची शब्दाचा अर्थ ‘पहाटेचा पहिला उजेड’ असा आहे. हे बलुच मुक्तिसंग्रामाच्या नव्या टप्प्याचे प्रतीक मानले जाते. या मोहिमेत रणनीतीपूर्ण अचूकता, संघटित हल्ले आणि आक्रमणाची झलक दिसून आली. ‘बीएलएफ’चे प्रवक्ते ग्वाहराम बलुच यांच्या म्हणण्यानुसार, ’या मोहिमेत थेट हल्ले, सापळ्यात ओढून मारणे आणि ड्रोन पाडणे यांचा समावेश होता.’
या कारवाईत पाकिस्तानच्या सुरक्षादलांचे ५० सैनिक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. विशेषतः मुसाखेलमधील हल्ल्यामध्ये नऊ ‘आयएसआय’चे गुप्तचर अधिकारीही ठार झाले. यामुळे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला मोठाच हादरा बसला. ‘बीएलएफ’ने २२ ठिकाणी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सैन्याची हालचाल थांबवली आणि पाकिस्तानी सरकारला अजून एक धक्का दिला.
मक्रान किनार्यापासून ते कोह-ए-सुलेमानच्या डोंगरांपर्यंत, एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. लष्करी छावण्या, आर्थिक मार्ग, गॅस वाहून नेणार्या वाहने आणि दूरसंचार टॉवर पाडणे यांसारख्या कारवायांमधून ‘बीएलएफ’च्या ताकदीची झलक दिसली.
पाकिस्तानला थेट संदेश
ग्वाहराम बलुच यांनी निवेदनात पाकिस्तानच्या लष्करासह पंजाबी सत्ताधारी वर्गालाही संदेश दिला की, हिंसाचार आणि दडपशाही यांवर आधारित पाकिस्तानची धोरणे आता यशस्वी होणार नाहीत. त्यांनी पाकिस्तानवर वसाहतवादी अजेंडा राबवण्याचा आरोप केला आणि स्पष्ट केले की, बलुचिस्तान ही फक्त संसाधन पुरवणारी जागा राहणार नाही, त्यावर बलुच जनतेचाही हक्क आहे. मुसाखेलमध्ये ठार मारण्यात आलेले नऊजण हे लष्करी अधिकारी होते, सामान्य नागरिक नसल्याचे ‘बीएलएफ’ने स्पष्ट केले.
स्थानिक पाठिंबा आणि नव्या रणनीतीचे सूचक
या मोहिमेत ’बीएलएफ’ला स्थानिक लोकांचाही पाठिंबा दिसून आला. सशस्त्र लढवय्ये आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते आणि स्थानिकांशी थेट संवाद साधत होते. याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने अनेक अटकसत्रे सुरु केली आणि इंटरनेट सेवा बंदी केली. यामधून त्यांची भीतीच स्पष्ट झाली. अजून हे ऑपरेशन सुरूच आहे. पाकिस्तान सैन्यानचा दावा आहे की, त्यांनी दि. २१ जुलै रोजीपर्यंत नऊ बलुच दहशतवाद्यांना मारले आहे.
‘ऑपरेशन बाम’ हे बलुच जनतेसाठी, एक जागृतीचे प्रतीक ठरले आहे. आतापर्यंत विखुरलेले वाटणार्या लढ्याला दिशा प्राप्त झाली आहे. या मोहिमेनंतर ‘बीएलएफ’ आता फक्त अधूनमधून करण्यात येणार्या गुरिल्ला हल्ल्यांवर भर न देता, योजनाबद्ध लष्करी कारवायांकडे वळण्याची शक्यता आहे. या मोहिमा पाकिस्तान व पंजाबी सत्ताधार्यांना थेट आव्हान असून, त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी अधिक जोर धरत आहे.
सीपेक कॉरिडोरवरील परिणाम धोका आणि अस्थिरता वाढली
‘ऑपरेशन बाम’मुळे बलुचिस्तानमधील असंतोष अधिकच संघटित आणि आक्रमक पद्धतीने समोर आला आहे. ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्पांपैकी बहुतांश महत्त्वाचे रस्ते, बंदरे आणि ऊर्जा प्रकल्प बलुचिस्तानमध्येच आहेत, विशेषतः ग्वादार बंदर! या प्रकल्पांवर सातत्याने होणार्या हल्ल्यांमुळे, चीनची गुंतवणूक धोयात येते आणि ‘सीपीईसी’ची व्यावहारिकता शून्य झाली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये फसला आहे.
ग्वादार बंदरावर झालेल्या हल्ल्यांनी आणि गॅस व तेल वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नांनी पाकिस्तान आणि चीनचे आर्थिक व सामरिक नुकसान केले, शिवाय पाईपलाईन सुरक्षाही धोयात आली. चीनच्या दृष्टिकोनातून ‘सीपीईसी’ हा ‘बेल्ट अँड रोड इनिशिटिव्ह’चा मुख्य भाग आहे. परिणामी बलुच चळवळीमुळे निर्माण होणारी अस्थिरता, चीनसाठीही अडथळा होते आहे.
पाकिस्तान सैन्यावर होणारा परिणाम
‘ऑपरेशन बाम’मध्ये ८४ समन्वित हल्ले आणि ५० पेक्षा अधिक सैन्य हत्यांचे केलेले दावे, पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या अपयशाचे निदर्शक आहेत. ’आयएसआय’चे नऊ अधिकारी मारले गेल्याने, त्यांच्या ऑपरेशनल क्षमतेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. पाकिस्तान सध्या बलुच चळवळीविरोधात पारंपरिक आणि हायब्रिड वॉरफेअर वापरत आहे. जसे की, माहिती युद्ध, मीडिया प्रपोगंडा, नागरिकांवर नियंत्रण. पण, ‘बीएलएफ’सारख्या गटांनी आता ड्रोनचा वापर, समन्वित ब्लॉकेड्स आणि गुप्तचर लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने, बलुच हायब्रिड युद्धसुद्धा लढत आहे.
पुढील दोन वर्षांत काय घडू शकते?
‘ऑपरेशन बाम’नंतर ‘बीएलएफ’ आणि इतर बंडखोर गट अधिक चांगल्या समन्वयाने कारवाया करतील. त्यांची पश्चिम बलुचिस्तान (इराणमध्ये) आणि अफगाण सीमेवर तेहरीक-ए-तालिबानशी जोडणारी युती निर्माण होत आहे.
आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले जाईल : पाकिस्तानचा अंतर्गत संघर्ष वाढेल :
आता भारत, अमेरिका, युरोपियन देश आणि संयुक्त राष्ट्रसंघ या विषयात जास्त रस घेऊ शकतात, विशेषतः मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल. पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबावही वाढू शकतो. पंजाब, सिंध, पश्तून भागांतही मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरी त्यांनाही प्रेरणा देऊ शकते. आर्थिक संकट, महागाई आणि ‘आयएमएफ’च्या दबावामुळे पाकिस्तान सरकार कमकुवत होत आहे.
बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र बनू शकते का?
बलुचिस्तानच्या लढ्याला स्थानिक समर्थन वाढत आहे व ‘ऑपरेशन बाम’मध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आणि समर्थन दिसून मोठ्या प्रमाणात दिसून आले.
राजकीय दिशा स्पष्ट होत आहे : ‘बीएलएफ’ आता केवळ बंडखोरी नाही, तर स्वातंत्र्य, मानवाधिकार, संसाधनांवरील हक्क याबाबत राजकीय संदेश देत आहेत.
जागतिक सहानुभूती मिळण्याची संधी : जर पाकिस्तानकडून अत्याचार, इंटरनेट बंदी आणि बेकायदेशीर अटक सुरूच राहिल्या, तर बलुच चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळू शकते.
अडथळे
चीनचा विरोध : ‘सीपीईसी’मधील गुंतवणुकीमुळे, चीन बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास विरोध करेल.
पाकिस्तान लष्कराची पकड : अजूनही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराची मोठी उपस्थिती आहे. त्यामुळे बलुचिस्तानचे स्वातंत्र्य दीर्घकालीन संघर्षाचे रूप धारण करत आहे.
जागतिक दुहेरी धोरण : अनेक देश पाकिस्तानशी सैन्य व आर्थिक करारात गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांनी उघडपणे बलुच चळवळीला समर्थन देणे कठीण जाणार आहे.
निष्कर्ष-पुढचा मार्ग
‘बीएलएफ’ने स्पष्ट केले आहे की, ‘ऑपरेशन बाम’ ही त्यांच्या लढ्याची केवळ सुरुवात आहे. यापुढे आणखी व्यापक आणि परिणामकारक कारवायांचे नियोजन सुरू आहे. त्यांच्या मते, जर पाकिस्तानचा सत्ताधारी वर्ग बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या हक्काकडे दुर्लक्ष करीत राहिला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
‘ऑपरेशन बाम’मुळे बलुच स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. येवढे नक्की की, यामुळे ५० टक्क्यांहून जास्त सैन्य आता पाकिस्तानमध्येच दहशतवादाविरोधी अभियानात अडकले आहे. ही केवळ बंडखोरी नसून, ती एक संघटित, सामरिक, राजकीय चळवळ बनत आहे.
बलुचिस्तान स्वतंत्र होईल का, हे पाकिस्तानची अंतर्गत स्थिरता, आंतरराष्ट्रीय राजकारण, चीनचा हस्तक्षेप आणि स्थानिक जनतेचे दीर्घकालीन पाठबळ या अनेक घटकांवर अवलंबून आहे.