कारगिल : एक संहारक यशोगाथा

26 Jul 2025 12:02:21

स्वातंत्र्य मिळाल्यापासून काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानने जंगजंग पछाडले. अनेक युद्धही त्याने भारतावर लादली. प्रत्येक युद्धात भारताने वीरश्रीची शर्थ करून, पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातले. तरीही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहिली. आजवरच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धांपैकी कारगिल हे अविस्मरणीय असेच. आज ‘कारगिल विजय दिवसा’निमित्त या शौर्यगाथेचे हे वीरस्मरण...

इतिहासात असे काही क्षण येतात जे फक्त युद्धाच्या रणभूमीवरच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या स्मरणात कायमचे कोरले जातात. अशाच एका थरारक, रोमांचक आणि असामान्य शौर्यगाथेने भरलेल्या पर्वाचं नाव आहे कारगिल युद्ध. हे केवळ शस्त्रांनी लढलेलं युद्ध नव्हतं, तर ती होती एक महायात्रा शौर्याची, त्यागाची, प्रेरणेची आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची.

1999 सालच्या त्या दोन महिन्यांहून अधिक काळात हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जे काही घडलं, ते केवळ सीमांचं रक्षण नव्हतं तर ती होती देशाच्या अस्मितेची लढाई. हाडे गोठवणार्‍या थंडीमध्ये, प्रचंड उंचीवर, विरळ हवामानात आणि अशक्य वाटणार्‍या भूप्रदेशात भारतीय सैनिकांनी दिलेला हा लढा म्हणजे हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर कोरलेली देशभक्तीची ओळच ठरावी.

दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वांत उंच भूमीत कारगिलचे युद्ध झाले. दि. 3 मे ते दि. 26 जुलै हा तो कालावधी. या युद्धातील प्रत्येक दिवसाच्या स्मृती लष्करातर्फे जागवल्या जातात. तेव्हाची युद्धभूमी ते आजचे कारगिल यात भरपूर फरक आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तुमचा शत्रू तुमच्या डोक्यावर चढून वार करत होता. टायगर हिलवरच्या आपल्या चौक्या ताब्यात घेऊन, पाकिस्तानने छुपा वार केला होता. गुराख्यांनी तिथे आपले लष्कर नसल्याची बातमी आणली; तोवर कारगिल-श्रीनगर रस्त्यावरून जाणार्‍या लष्कराच्या गाड्यांना रॉकेट लॉन्चने टार्गेट केले होते. शत्रू नेमका कुठे आहे तेच कळत नव्हते.

1947, 1965 आणि 1971 या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. भारताने पाकिस्तानचा सियाचीन हिमनद्यांचा ताबा घेण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरला होता. पाकिस्तानने जर हा ताबा घेतला असता, तर काराकोरम खिंडीपर्यंतचा भाग पाकिस्तानच्या आधिपत्याखाली आला असता. सियाचीन हिमनद्यांचा भूभाग वेगळा पाडून गिळंकृत करण्यासाठी, या भूभागाच्या दक्षिणेकडील प्रदेशावर ताबा मिळवणे आणि द्रास-लेहसारख्या रस्त्यांवर स्वतःच्या प्रभावाने भारताच्या सामरिक हालचाली खंडित करणे, हे सामरिकदृष्ट्या पाकिस्तानच्या फायद्याचे ठरणार होते.

ऑक्टोबर 1998 मध्ये दोन वरिष्ठांना डावलून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जनरल परवेज मुशर्रफ यांना सरसेनापतिपद बहाल केले. मुशर्रफ आणि ‘आयएसआय’ या दोहोंच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न प्रज्वलित राहणे आवश्यक होते. काश्मीर खोर्‍यातील ‘आयएसआय’च्या कारवायांना भारतीय सुरक्षादलांनी लगाम घातल्याने, एक नवीन कुरापत काढण्यासाठी कारगिलची निवड करण्यात आली. कारगिल भागात घुसखोरी केल्याने पाकिस्तानचे दोन उद्देश साध्य होणार होते एक म्हणजे, काश्मीरचा प्रश्न नव्याने धुमसणार होता आणि दुसरे म्हणजे, कारगिलमधील घुसखोरीमुळे सियाचीनचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार होती.

ऑक्टोबर 1998 ते मार्च 1999 या कालावधीत पाकिस्तानकडून घुसखोरीसाठी आवश्यक शस्त्र ते खाद्य अशी सर्व तयारी करण्यात आली. पाकिस्तानकडून 1999 सालच्या सुरुवातीला प्रथम निरीक्षण पथके पाठविण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये ‘पाकिस्तान नॉर्थ लाईट इन्फण्ट्री’च्या तुकड्यांनी कुच केले. रसद, दारूगोळा आणि हत्यारे पुढे आणली गेली. विविध डोंगरमाथ्यांवर बंकर्स उभारण्यात आली. त्यात 50-55 पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या. मशीनगन, रॉकेट लॉन्चर, स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर, मोर्टर, विमानविरोधी तोफा आणि विमानांवर अचूक मारा करणारी अत्याधुनिक प्रक्षेपणास्त्रे ठेवण्यात आली, भूसुरुंगही पेरण्यात आले. 1998-99 सालचा हिवाळा सौम्य असल्यामुळे, हे काम सुकर झाले. काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांची ही कामगिरी आहे असे भासविण्यासाठी, सैनिकांनाही सलवार-कमीजचा पेहराव दिला गेला. वास्तविक ‘जिनिव्हा करारा’चे हे उल्लंघनच होते.

1998-99 सालच्या सौम्य हिवाळ्यामुळे एका बाजूस पाकिस्तानची घुसखोरी सुकर झाली, तर दुसर्‍या बाजूस नैसर्गिक बदलानुसार 1999च्या मे मध्येच बर्फ वितळल्यामुळे येथील मेंढपाळांना काकसर आणि बटालिक यांमधील डोंगरदर्‍यांत पाकिस्तानी सैनिक मोर्चे बांधत असलेले दिसले. दि. 4 मे रोजी मेंढपाळांकडून ही बातमी भारतीय सैन्याला मिळाल्यावर, चक्रे वेगाने फिरली. काश्मीर खोर्‍यात असलेल्या ’आठ माऊंटन डिव्हिजन’ला तातडीने कारगिलकडे कूच करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दि. 21 मे 1999 रोजीपर्यंत पूर्ण तुकडी तेथे पोहोचली. पाकिस्तानच्या घुसखोरीबाबत संरक्षण मंत्रालयाने दि. 25 मे रोजी माहिती दिली.

उंचावरचे पाकिस्तानी मोर्चे सभोवतालच्या प्रदेशावर निरीक्षण आणि प्रभुत्व गाजवण्यास परिपूर्ण होते. उभ्या सरळ डोंगरी कडा, दुर्गम पाऊलवाटा, सात-आठ हजार फूट शत्रूच्या नजरेखाली चढून जाताना होणारी दमछाक, अंगावर जड कपडे, पाठीवर शस्त्र, दारूगोळा आणि खाण्याच्या सामानाचे वजन हे सगळे पेलत, दुर्गम शिखरांवर ठाण मांडलेल्या पाकिस्तानी सैन्यांवर हल्ला चढविणे व त्यांना ताबारेषेमागे हाकलणे ही खडतर कामगिरी होती. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यक होती. भारतासमोर मुख्यतः दोन पर्याय होते पहिला, ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा, पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. भारताने 1971 सालानंतर ‘शिमला करारा’चे काटेकोरपणे पालन केले होते. भारताने आता ताबारेषा ओलांडणे म्हणजे, पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते. जर ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटता आले, तर भारताच्या नैतिक तत्त्वांना पुष्टी मिळाली असती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबाही लाभला असता. परंतु, डोंगराळी प्रदेशातील कणखर मोर्चांवर समोरून हल्ले चढविणे, हे सैनिकी सिद्धांतांविरुद्ध होते. यासाठी हाडामांसाची किंमत द्यावी लागली असतीच परंतु, त्याला लागणार्‍या वेळामुळे अपयशाचीही दाट शक्यता होती. याउलट, पाकिस्तानवर इतरत्र हल्ला चढविल्यास, दक्षिण आशियात अण्वस्त्र युद्धाची संभावना निर्माण झाली असती. दोन्ही बाजूंनी भारत कचाट्यात सापडला होता. निर्णय घेण्याची जबाबदारी तत्कालीन वाजपेयी सरकारवर होती. सर्व बाजूंचा सारासार विचार करून, पंतप्रधान वाजपेयींनी पहिला पर्याय निवडला. एका बाजूला ताबारेषा न ओलांडण्याच्या नैतिक निर्णयाकरवी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवायचा आणि पाकिस्तानवर घुसखोरी मागे घेण्यासाठी दबाव आणायचा. दुसर्‍या बाजूला लष्करी बल पणाला लावून, पाकिस्तानच्या घुसखोरीचा धुव्वा उडवायचा. ही द्विस्तरीय रणनीती अवलंबण्याचे वाजपेयींनी ठरवले. यात प्राणहानीची जोखीम होतीच परंतु, आपल्या लष्करावर पंतप्रधानांचा दृढ विश्वास होता. या नीतीचा भारताने निग्रहाने आणि परिणामकारकरित्या पाठपुरावा केला.

पाकिस्तानी मोर्चाबंदीचे प्रामुख्याने दोन विभाग होते. पहिला द्रास-मश्को विभाग आणि दुसरा बटालिक विभाग. द्रास विभागात पाकिस्तानने ’टोलोलिंग, पॉईंट 4700’, ’पॉईंट 5140’, ’पॉईंट 4590’,’टायगर हिल’ वगैरे ठिकाणी ठाणी उभारली होती. (पॉईंट 5140 म्हणजे 5140 मीटर उंचीचा डोंगरमाथा) बटालिक विभागात जुब्बार आणि खालुबार डोंगरसर्‍यांवरील वेगवेगळ्या उंचवट्यांवरही त्यांनी ठाणी उभारली. द्रास विभागात सर्वांत प्रथम टोलोलिंगच्या मोर्चावर हल्ले चढविण्यात आले. एक हजार, 500 फूट उंचीच्या या बलवत्तर आणि भक्कम ठाण्यावरून, शत्रू महामार्गावर गोळीबार करू शकत होता. हे ठाणे सर्वांत प्रथम काबीज करणे आवश्यक होते. हे काम ’18 ग्रिनेडिअर्स’ या पलटणीला देण्यात आले. दि. 22 मे रोजी चढाई सुरू झाली; परंतु टोलोलिंगच्या वाटेतील पॉईंट 4590वरून शत्रूचा अचूक गोळीबार होऊ लागल्याने, पुढे जाणे अशक्य झालेे. त्यानंतर अनेक हल्ले अयशस्वी झाले. विशेषकरून शत्रूचा एक बंकर कमालीच्या मोक्याच्या स्थानावर होता. तब्बल 20 दिवस शत्रूने भारतीय तुकड्यांना पुढे येऊ दिले नाही. दि. 11 व दि. 12 जून रोजी बोफोर्स तोफा उघड्यावर आणून, त्यांतून बरबाद बंकरवर थेट मारा करण्यात आला. हे एक निर्णायक वळण होते. नेम धरून येणारा गोळीबार खंडित झाल्यावर दोन ‘राजपुताना रायफल्स’, ‘जम्मू-काश्मीर रायफल्स’ आणि 18 ‘गढवाल’ या तीन पलटणींनी, तीन वेगवेगळ्या दिशांनी एकाच वेळी हल्ला करून तो पॉईंट सर केला. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी दाखविलेला पराक्रम व नेतृत्वासाठी त्यांना ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले. त्यानंतर 18 गढवालने खंबीर झुंज देऊन पॉईंट 4700वरही ताबा मिळविला. त्याच्या पाडावानंतर ‘टायगर हिल’ या सर्वांत कठीण ठाण्यावर 18 ग्रिनेडिअर आणि आठ शीख या दोन पलटणींनी हल्ला चढविला. एका रोमांचकारी लढतीनंतर तेही सर केले. या लढाईत ग्रिनेडिअरच्या योगेंद्रसिंग यादव यांना ‘परमवीर चक्रा’ने गौरविण्यात आले. ‘टायगर हिल’ हा पाकिस्तानचा सर्वांत महत्त्वाचा बालेकिल्ला होता, तो कोसळल्यानंतर मुशर्रफांचे धाबे दणाणले. त्यानंतर पॉईंट 4875वर पुन्हा ’13 जम्मू-काश्मीर रायफल्स’, ’17 जाट’ आणि ’2 नागा’ या पलटणींनी हल्ला चढविला. एका घनघोर चकमकीनंतर ते बंकर्स भारतीय लष्कराने पुन्हा ताब्यात घेतले. यादरम्यानच कॅप्टन विक्रम बत्रांना हौतात्म्य आले. ’13 जम्मू-काश्मीर रायफल्स’चा रायफलमन संजयकुमार यांना त्यांच्या अचाट पराक्रमासाठी ‘परमवीर चक्रा’ने सन्मानित करण्यात आले.

बटालिक विभागात एक बिहारने जुब्बार ठाण्यावर हल्ला चढविला, पण, तो यशस्वी झाला नाही. शेवटी तब्बल एक महिन्याच्या झुंझीनंतर दि. 7 जुलै रोजी ते बंकर्स आपल्या ताब्यात आले. याचबरोबर खालुबार डोंगरसरीवरील बंकरवर ‘1/11 गोरखा रायफल्स’ आणि ‘12 जम्मू-काश्मीर रायफल्सलाईट इन्फण्ट्री’ या दोन पलटणींनी, दि. 25 मे रोजीपासून हल्ले सुरू केले. दि. 7 जुलै रोजीपर्यंत सर्व बंकर्सवर त्यांनी ताबा मिळवला. खालुबारवरील दि. 2 व दि. 3 जुलै रोजीच्या रात्री ‘1/11 गोरखा रायफल्स’चे लेफ्टनंट मनोज पांडे यांना दिव्य पराक्रमासाठी, मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

भारतीय लष्कराच्या चढाई करणार्‍या तुकड्यांवर अचूक गोळाफेक करणार्‍या पाकिस्तानी मोर्चाचे बळ क्षीण करण्याचा आणि त्यांच्यावर परिणामकारक भडिमार करण्याचा एक मार्ग होता तो म्हणजे, लढाऊ विमानांचा उपयोग. परंतु, एकतर त्यामुळे शत्रूच्या वायुसेनेला आव्हान दिल्यासारखे झाले असते आणि दुसरे म्हणजे आपल्याच प्रदेशात शत्रूच्या मोर्चावर मारा करण्यासाठी विमानांचा उपयोग हा नवीन पायंडा ठरला असता. त्याचबरोबर उंच डोंगरांच्या कडेकपारीतील मोर्चांवर लढाऊ विमाने चालविणे कठीण होते. तरीही या घटकांना न जुमानता, वायुसेनेचा वापर करायचा लक्षणीय निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. दि. 26 मे रोजी प्रथमच वायुसेनेची विमाने कारगिलच्या आसमंतात झेपावली. त्यानंतर ‘मिग21 बिझ’, ‘मिग23 बी एन’, ‘मिग27 एम’, ‘मिग29 बी’ आणि शेवटी ‘मिराज-2000’ या लढाऊ विमानांनी, तसेच, ‘एमआय17’ हेलिकॉप्टर्सनी जवळजवळ तीन हजार, 400 उड्डाणे करून पाकिस्तानी घुसखोरांच्या नाकीनऊ आणले. यात भारताने दोन ‘मिग27’ आणि एक ‘एमआय17’ हेलिकॉप्टर गमावले. मर्यादित युद्धात, वायुसेनेचा नियंत्रित उपयोग हा एक अभूतपूर्व प्रयोग होता. वायुसेनेने आपल्या अलौकिक कामगिरीने विलक्षण प्रभाव पाडला.

पराभवाची चिन्हे दिसू लागताच, नवाझ शरीफ यांनी भारतीय पंतप्रधानांना चर्चेसाठी भेटण्याची विनंती केली. घुसखोरी मागे घेतल्याशिवाय चर्चेस ठाम नकार मिळाल्याने त्यांनी चीनकडे धाव घेतली; पण चीनने ताबारेषेचा मान राखत, या संघर्षाची सांगता करण्याचा सल्ला दिला. शेवटी दि. 4 जुलै रोजी टायगर हिलचा बालेकिल्ला पडल्यावर शरीफ यांनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिटंन यांच्याकडे धाव घेतली. वॉशिंग्टनमध्ये चर्चेपश्चात आपल्या सैन्याला कोणत्याही अटीशिवाय ताबारेषेच्या मागे घेण्याचे त्यांनी कबूल केले. दि. 11 जुलै 1999 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘डीजीएमओ’ पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने, दि. 16 जुलै रोजीपर्यंत सर्व घुसखोरांना परत बोलावण्याची शाश्वती दिली. याचदिवशी कारगिल युद्धात पाकिस्तानच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा अजरामर झाली. प्रारंभी अपयशाचे संपूर्ण यशात रूपांतर करणारा हा कारगिल संग्राम, सैनिकी इतिहासात सदैव अजरामर राहील.

या संग्रामात प्रत्येक गोळीच्या आवाजामध्ये निर्धार होता, प्रत्येक श्वासामध्ये मातृभूमसाठी बलिदानाची तयारी होती आणि प्रत्येक हल्ल्यामागे स्वातंत्र्याच्या रक्षणाचा जागर होता. कारगिल युद्धात भारतीय जवानांनी शौर्याच्या नव्या व्याख्या निर्माण केल्या. या युद्धाने संपूर्ण राष्ट्राला एक अभिमानाची, अस्मितेची आणि आत्मविश्वासाची ओळख दिली. या विजयामागे असलेले लढवय्ये, त्यांचे पराक्रम आणि त्याग आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत. हा लेखनप्रपंच म्हणजे, असंख्य वीरांच्या शौर्यगाथेची साक्ष आहे. देशासाठी बलिदान देणार्‍यांमुळेच आपल्याला स्वातंत्र्याचा, शांततेचा आणि सुरक्षिततेचा श्वास घेता येतो. कारगिल विजय हा एक सैनिकी संघर्ष नसून, जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे अमर तेज आहे. कारगिल विजय म्हणजे केवळ युद्ध नाही, तर धैर्य, समर्पण आणि मातृभूमीवरील प्रेमाचं प्रतीक आहे.
जयहिंद! वंदे मातरम्!

योगेश चकोर
(लेखक नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल येथे शिक्षक आणि एनसीसी अधिकारी आहेत.)

Powered By Sangraha 9.0