भारत-युके मुक्त व्यापार करार ऐतिहासिक; ९९ टक्के भारतीय निर्यातीस करमुक्त प्रवेश – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

26 Jul 2025 17:10:46

नवी दिल्ली :  भारत आणि युनायटेड किंगडम (युके) यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) नुकत्यात स्वाक्षऱ्या झाल्या असून, हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. या करारामुळे भारताच्या एकूण निर्यातींपैकी ९९ टक्के निर्यात युकेमध्ये करमुक्तपणे प्रवेश करू शकणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केले.

भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री गोयल यांनी या कराराचे महत्त्व सांगताना तो आतापर्यंत भारताने केलेल्या सर्व मुक्त व्यापार करारांपैकी सर्वांत मोठा, सर्वसमावेशक आणि सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. हा करार भारतातील शेतकरी, लघुउद्योग (एमएसएमई), उद्योजक, तरुण, आणि मच्छीमार यांच्यासाठी परिवर्तन घडवणारा ठरेल. या करारामुळे केवळ व्यापार वाढणार नाही, तर लाखो कुटुंबांना आणि स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे, असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.

या करारास भारत सरकारकडून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, आता फक्त युकेच्या संसदेमधील मंजुरीची प्रतीक्षा आहे. करार अंमलात आल्यानंतर भारतीय निर्यातदारांना युकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कररहित संधी उपलब्ध होतील. गोयल यांनी सांगितले की, भारताने या करारात आपली अट ताठ ठेवत चर्चा केली असून, त्यातून भारताच्या हिताचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या काळात झालेल्या एफटीए वर जोरदार टीका करताना सांगितले की, त्या काळात भारताच्या स्पर्धक देशांशी करार करण्यात आले होते, ज्यामुळे स्वस्त वस्तूंच्या आयातीतून भारतातील उत्पादन क्षेत्राला फटका बसला. उलटपक्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, युएई, ईएफटीए देश आणि आता युकेसारख्या भारतपूरक देशांशीच करार केले आहेत. हे करार भारताच्या आर्थिक आणि व्यापार धोरणाशी सुसंगत असून, ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनाला गती देणारे आहेत, असेही ते म्हणाले.

भारत आणि युकेने २०३० पर्यंत आपला परस्पर व्यापार १२० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. युके सरकारच्या माहितीनुसार, या करारामुळे भारतात येणाऱ्या युके वस्तूंवरील सरासरी आयातशुल्क १५ टक्क्यांवरून केवळ ३ टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे भारत-युके व्यापार अधिक सुलभ आणि परस्परपूरक स्वरूपाचा होईल. हा करार केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित न राहता भारताच्या वाढत्या जागतिक भूमिका, आत्मनिर्भरता, आणि उत्पादनक्षमतेच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे. दोन्ही देशांच्या हितसंबंधांना सामावून घेणारा आणि परस्परपूरक व्यापार वृद्धिंगत करणारा हा करार 'विकसित भारत' या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

कोल्हापुरी चपलांना मिळणार जागतिक ओळख

भारत-युके करारामध्ये कोल्हापुरी चपलांना विशेष मान्यता मिळाली आहे. या पारंपरिक भारतीय हस्तकलेच्या उत्पादनावर भारताचा 'जीआय टॅग' असून, याचे डिझाईन व बौद्धिक संपदा हक्क भारताचे असल्याचे अधिकृत मान्य झाले आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले, जेव्हा एका जागतिक ब्रँडने कोल्हापुरी चपलेचा डिझाईन परवानगीशिवाय वापरला, तेव्हा मंत्रालयाने तात्काळ कारवाई केली. आता या करारामुळे भारताला कोल्हापुरी चपलेसाठी जागतिक मान्यता आणि श्रेय मिळणार आहे. या करारामुळे कोल्हापुरी चपलेच्या निर्यातीला मोठा गतीमान बाजारपेठ मिळेल. यामुळे या उत्पादनाचा वार्षिक आंतरराष्ट्रीय व्यापार ८,००० ते १०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अनेक जागतिक ब्रँड्स भारताच्या या पारंपरिक उत्पादनाशी आपले नाव जोडण्यासाठी उत्सुक आहेत, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0