नवी दिल्ली, भारताने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनच्या निर्मितीत यशस्वी पाऊल टाकले आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार, दि.२५ जुलै रोजी माहिती दिली की, भारतीय रेल्वेने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या कोचची यशस्वी चाचणी घेतली आहे.
मंत्री वैष्णव यांच्या सोशल मीडिया एक्स पोस्टनुसार, देश १२०० हॉर्सपॉवरच्या हायड्रोजन ट्रेनवर काम करत आहे, ज्यामुळे भारताला हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन तंत्रज्ञानात आघाडीवर स्थान मिळेल. "पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या कोचची (ड्रायव्हिंग पॉवर कार) चाचणी आयसीएफ, चेन्नई येथे यशस्वीरित्या करण्यात आली. भारत १२०० हॉर्सपॉवर हायड्रोजन ट्रेन विकसित करत आहे. यामुळे भारत हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन तंत्रज्ञानात आघाडीवर असेल," असे वैष्णव यांनी 'एक्स' वर पोस्ट केले.
केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी वर्ष २०२३ मध्ये राज्यसभेत माहिती देताना सांगितले होते की, भारतीय रेल्वेने "हायड्रोजन फॉर हेरिटेज" अंतर्गत ३५ हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. ज्याचा अंदाजे खर्च प्रति ट्रेन ८० कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, भारतीय रेल्वेने विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकवर हायड्रोजन फ्युएल सेलच्या रेट्रोफिटमेंटसाठी ₹१११.८३ कोटी खर्चाचा पायलट प्रोजेक्ट देखील मंजूर केला आहे. असा अंदाज आहे की, हायड्रोजन इंधन ट्रेन चालवण्याचा खर्च सुरुवातीला जास्त असेल, जो नंतर गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने कमी होईल. शिवाय, स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी हरित वाहतूक तंत्रज्ञानाच्या दिशेने इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर फायदेशीर ठरणार आहे.