‘एआय’च्या साथीने सुलभ शिक्षण

26 Jul 2025 21:13:13

रविवार उजाडला. जयंतराव, आदित्य आणि त्यांचे मित्र आज एका नव्या चर्चेसाठी हॉटेलात जमली होती.

आजोबा, आज आपण बोलणार आहोत, शिक्षण क्षेत्रात ‘एआय’ कसा बदल घडवत आहे याबद्दल. म्हणजे, भविष्यातील वर्ग कसे असतील, शिक्षण वैयक्तिक कसे होईल, शिक्षकांची भूमिका काय असेल हे सगळेच.

हा तर खूपच गरजेचा विषय आहे, माधव काका म्हणाले. शाळेत शिक्षक होतो मी पण, हल्ली मुलांचं लक्ष अभ्यासात राहतच नाही म्हणतात. तंत्रज्ञान त्यांना भरकटवतंय असं वाटतं.

पण, कधी कधी तेच तंत्रज्ञान योग्य वापरलं, तर क्रांती घडवू शकतं! आदित्य उत्साहाने म्हणाला. ‘एआय’ फक्त खेळ किंवा चॅटसाठी न वापरता, शिक्षणातही प्रभावीपणे वापरता येते.

वैयक्तिक शिक्षण-प्रत्येकासाठी स्वतःचा मार्ग


"सध्याची आपली शिक्षणपद्धती म्हणजे, ‘सब घोडे बारा टक्के’ पद्धतीची आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचे शिक्षण दिले जाते. वर्गात सगळ्यांना एकच धडा एकाच गतीने शिकवला जातो. ‘एआय’मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची गती, क्षमता आणि आवड लक्षात घेऊन, वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करता येतो,” आदित्य म्हणाला.

राम गणितात कमकुवत असेल आणि श्यामला इंग्रजीत अधिक सराव हवा असेल, तर दोघांनाही वेगवेगळी मदत मिळेल? माधव काका विचारात पडले.

बरोबर! समजा, एक विद्यार्थी गणितातील भूमितीमध्ये अडखळत असेल, तर ‘एआय’ आधारित प्लॅटफॉर्म त्याला भूमितीच्या मूलभूत संकल्पनांचे अधिक प्रश्न देईल किंवा दृश्य स्पष्टीकरण देईल. जो बीजगणितात पारंगत आहे, त्याला अधिक आव्हानात्मक समस्या किंवा पुढच्या स्तरावरील संकल्पनाही लगेच शिकायला मिळतील. ‘चॅट जीपीटी’, ‘खानमिगो’, ‘सेंचुरी टेक’, ‘स्क्विरल एआय’ अशी टूल्स विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांवरून पुढची संकल्पना काय शिकवायची, याचा निर्णय घेतात. काही टूल्स तर आवाज किंवा हावभावातून मुलाचं लक्ष केंद्रित आहे की नाही, हे सुद्धा ओळखतात. ‘खान अकादमी’च्या ‘खानमिगो’मध्ये शिकताना विद्यार्थी अडकला, तर तो थेट ‘एआय’ ट्यूटरला प्रश्न विचारू शकतो आणि त्याला वैयक्तिक मार्गदर्शनही मिळते. ‘ड्युओलिंगो’ सारखे भाषा शिकवणारे अॅप्स, याच तत्त्वावर काम करतात. तुमच्या चुकांमधून शिकून तुम्हाला कोणत्या शब्दांवर किंवा व्याकरणावर अधिक काम करायचे आहे, हे ओळखतात आणि त्यानुसार सराव देतात.

एआय : शिक्षकांचा सहकारी, पर्याय नव्हे

पण, मग शिक्षकांची काय गरज उरते? गणपतरावांनी शंका व्यक्त केली.

‘एआय’ शिक्षकांची जागा घेणार नाही, आदित्य स्पष्टपणे म्हणाला. उलट, त्यामुळे शिक्षकांना मदतच होणार आहे. गृहपाठ तयार करणे, उत्तर तपासणे, प्रगतीचे विश्लेषण करणे ही कामे ‘एआय’ लिलया करू शकतो; त्यामुळे शिक्षक मुलांवर जास्त लक्ष देऊ शकतात. कल्पना करा की, एका शिक्षकाला ४० विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासायच्या आहेत. हे काम वेळखाऊ आणि कंटाळवाणे असू शकते पण, ‘एआय’मुळे एका लिकवर गृहपाठाची तपासणी होते. शिक्षकाला कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, हे ‘एआय’च्या अहवालातून लगेच समजते. समजा, एका शिक्षकाला एका विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी ओळखायच्या आहेत. ‘एआय डॅशबोर्ड’ त्या विद्यार्थ्याने कोणत्या प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली, त्याला कोणत्या संकल्पना समजल्या नाहीत, हे दाखवतो. यामुळे शिक्षक आपला वेळ प्रशासकीय कामांमध्ये घालवण्याऐवजी मुलांना शिकवण्यात, त्यांच्या शंका दूर करण्यात आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढवण्यात वापरू शकतात.

जगात कुठे कुठे वापर?

हे सगळं प्रत्यक्षात कुठे चालू आहे का?

हो ना! जगात अनेक ठिकाणी ‘एआय’चा शिक्षणात वापर होतो आहे. भारतात ‘लीड स्कूल्स’ ‘एआय डॅशबोर्ड’ वापरतात, जिथे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सखोल विश्लेषण मिळते आणि त्यानुसार ते अभ्यासक्रमात बदल करू शकतात. अमेरिकेत आणि युरोपमध्ये ‘खान अकादमी’ने ‘जीपीटी-४’ वापरून ‘खानमिगो’ तयार केलं आहे, जे विद्यार्थ्यांना वैयक्तिक ट्यूटरिंग देतं. चीनमध्येही ‘स्क्विरल एआय’ सारख्या कंपन्या, लाखो विद्यार्थ्यांना ‘एआय’आधारित वैयक्तिक शिक्षण देत आहेत. ‘गुगल लासरूम’ ‘एआय’चा वापर करून, शिक्षकांना मुलांच्या प्रगतीचे सुस्पष्ट अहवाल देते. यामुळे शिक्षक लवकर निर्णय घेऊ शकतात. जपानमधील काही शाळांमध्ये, ‘एआय’आधारित रोबोट्स विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकोच न बाळगता संवाद साधता येतो. हे केवळ मोठ्या शहरांमध्ये नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातील शाळांमध्येही हे प्रयोग राबवले जात आहेत.

फारच छान! म्हणजे हे केवळ स्वप्नरंजन नाही, तर प्रत्यक्ष वापरातलं वास्तव आहे, जयंतराव खूश झाले.

एआय + भाषांतर = सर्वसमावेशी शिक्षण

गावाकडील मुलांना फायदा होईल का? गणपतरावांनी विचारलं.

अगदी! ‘एआय’ इंग्रजीतला मजकूर मराठीत किंवा कोणत्याही भाषेत अनुवाद करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान, त्यांच्या मातृभाषेत सहज उपलब्ध होते. ‘एआय’ दिव्यांग मुलांसाठीदेखील शिक्षण सुलभ करतं. समजा, दृष्टिहीन मुलांना एखादे चित्र किंवा आकृती समजून घ्यायची असेल, तर ‘एआय’ त्या चित्राचे सविस्तर वर्णन आवाजात रूपांतरित करून सांगू शकते. ‘डिस्लेसिया’ असलेल्या मुलांना वाचनात अडचण येते, त्यांच्यासाठी ‘एआय’आधारित ‘टेस्ट-टू-स्पीच’ साधने मजकूर वाचून दाखवतात. यामुळे त्यां मुलांना आकलन करणे सोपे होते. ज्या मुलांना संवाद साधायला अडचण येते, त्यांच्यासाठीही ‘एआय’आधारित अॅप्स त्यांच्या बोलण्यातील त्रुटी सुधारून, अधिक स्पष्टपणे बोलण्यासाठी मदत करतात किंवा त्यांच्या हावभावातून त्यांच्या भावना ओळखून, शिक्षकांना संवाद साधायला मदत करतात. यामुळे विशेष गरजा असलेल्या मुलांना, मुख्य प्रवाहात आणणे अधिक सोपे होते.

एआय + एआर, व्हीआर (अठ/तठ) = विज्ञानाचा अनुभव

अहो, विज्ञान शिकवताना प्रयोग दाखवणं फार कठीण जायचं, माधव काका आठवत होते. काही प्रयोग तर शाळेत करणे शयच नसायचे, धोकादायक असायचे किंवा त्यासाठी लागणारी उपकरणे खूप महाग असायची.

आता ‘एआर’, ‘व्हीआर’च्या मदतीने, ‘एआय’ वापरून सौरमाला, मानवी शरीर, केमिकल रिएशन अशा गोष्टी विद्यार्थ्यांना थ्रीडीमध्ये बघता येतात आणि त्यांच्याशी संवादही साधता येतो. म्हणजे, प्रत्यक्ष प्रयोगशाळा जणू डोळ्यांसमोरच उभी राहते. कल्पना करा, विद्यार्थी आपल्या घरात बसून व्हर्च्युअल रिलिटी हेडसेट लावून, मानवी हृदयाची अंतर्गत रचना तपासत आहे. प्रत्येक व्हॉल्व्ह आणि धमनी कशी काम करते हे जवळून बघत आहे किंवा रासायनिक अभिक्रिया शिकताना, तो आभासी पद्धतीने रसायने मिसळून त्याचे परिणाम सुरक्षितपणे बघू शकतो. बेडकाचे विच्छेदन करण्यासाठी, प्रत्यक्ष प्राण्याऐवजी विद्यार्थी ‘एआय’च्या मदतीने एका थ्रीडी बेडकाचे विच्छेदन करू शकतो. यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता, प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकणे शय होते.

भविष्यातील वर्ग-वैयक्तिक आणि सर्वसमावेशक

भविष्यातील वर्ग खूप वेगळा आणि वैयक्तिक असेल. शिक्षकासोबत ‘एआय’ असेल, जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीचे आणि शैलीचे विश्लेषण करेल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार पुढचा अभ्यास मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या संकल्पनेत अडचण येत असेल, तर ‘एआय’ त्याला लगेच त्या संकल्पनेशी संबंधित पूरक साहित्य, व्हिडिओ किंवा प्रश्न देईल. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी त्यांना विचार करण्यास, समस्या सोडवण्यास आणि वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्यास प्रोत्साहन देतील. वर्ग केवळ चार भिंतींपुरता मर्यादित नसेल, डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थी कुठेही बसून शिकू शकतील. गणपतरावांनी हसत अनुमोदन दिलं.

धोके, मर्यादा आणि जबाबदारी


पण, ‘एआय’ने चूकीचे उत्तर दिलं तर? किंवा त्याच्या शिकण्यातील चुकांमुळे मुलांच्या ज्ञानात गडबड झाली तर? जयंतराव विचारात पडले.

होय! ‘एआय’ अजूनही परिपूर्ण नाही. म्हणूनच शिक्षकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. ‘एआय’ काही वेळा चुकीचे उत्तर देतो किंवा चुकीचा संदर्भ देतो, ज्याला ‘हॅल्युसिनेशन’ म्हणतात. म्हणूनच त्याची मानवी तपासणीही आवश्यक आहे. ‘एआय’ कोणता निर्णय कशाच्या आधारे घेत आहे, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. ‘एआय’ने दिलेला फीडबॅक विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम करू शकतो, त्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेची इथे गरज असते, जी फक्त मानवी शिक्षकच देऊ शकतात. उदाहरणार्थ, ‘एआय’ एखाद्या विद्यार्थ्याला सतत ‘तू या विषयात कमकुवत आहेस’ असा अहवाल देत राहिल्यास, त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. येथे शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते, जो विद्यार्थ्याला सकारात्मक प्रोत्साहन देईल आणि ‘एआय’च्या मर्यादा समजून घेईल.

विचार करण्याची शक्ती हरवू नये!


आजकाल ‘एआय’ सगळं करून देतो, मग मुलं विचार करायला शिकतील का? त्यांची सर्जनशीलता कमी होणार नाही का? माधव काकांनी प्रश्न केला.

अगदी बरोबर प्रश्न आहे. संशोधन असं सांगतं की जेव्हा उत्तर लगेच मिळतं, तेव्हा मेंदूला विचार करण्याची सवय राहत नाही. म्हणूनच ‘एआय’ साहाय्यक असावा; पर्याय नाही, आदित्य स्पष्टच बोलला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘एआय’चा वापर एक साधन म्हणून करायला शिकवायला हवं. उदाहरणार्थ, संशोधन प्रकल्पासाठी ‘एआय’चा वापर माहिती गोळा करण्यासाठी, कल्पनांना चालना देण्यासाठी किंवा मसुदा तयार करण्यासाठी करता येईल. पण, अंतिम विश्लेषण आणि स्वतःचे निष्कर्ष काढण्याचे काम विद्यार्थ्यांनीच केले पाहिजे.

‘एआय’च्या धोयांबद्दल आपण आता काही महत्त्वाचे मुद्दे बोललो. याच्याबद्दल थोडं सविस्तर बोलणं आवश्यक आहे, जयंतराव म्हणाले. नक्कीच, ‘एआय’च्या आणखी काही महत्त्वाच्या उपयोगांबद्दल बोलण्याआधी, आपण पुढच्या रविवारी ‘एआय’च्या धोयांबद्दल बोलू आदित्य म्हणाला.

(डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
९९२३४०२००१

Powered By Sangraha 9.0