लबाड जोडिती इमले माझ्या, कुळवंतांना मात्र झोपड्या!

26 Jul 2025 11:36:27

इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेला 50 वर्षीय हामित कोस्कन जन्माने तुर्कस्तानचा नागरिक आहे; पण वंशाने अर्धा कुर्द आणि अर्धा आर्मेनियन. फेब्रुवारी महिन्यात कोस्कन लंडनच्या तुर्कस्तानी वकिलातीसमोर गेला. त्याच्या एका हातात असलेले कुराण त्याने पेटवून वर धरले आणि ‘इस्लाम हा दहशतवादी इस्लाम धर्म आहे,’ अशा घोषणा दिल्या. पुढे प्रकरण न्यायालयात गेले. पण, त्या निकालाने इंग्लंडमध्ये ईशनिंदा कायदाच पुन्हा येऊ घातला आहे, अशी स्थिती निर्माण झालेली दिसते.

दि.11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी मुंबई शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरले. यावेळचा हल्ला मुंबईकरांची जीवनवाहिनी असणार्‍या लोकल रेल्वे गाड्यांवर झाला. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी खच्चून भरलेल्या लोकल गाड्यांमध्ये विविध ठिकाणी, एकंदर सात स्फोट झाले. साधारण 13 मिनिटांच्या अवकाशात लागोपाठ बॉम्बस् फुटत गेले. मरण किंकाळ्या, रक्ताचा सडा, तुटलेल्या अवयवांचा खच यांनी रेल्वे स्थानके आणि रुळवाटा सुन्न झाल्या. सुमारे 200 लोक ठार आणि 800 लोक जखमी झालेल्या या बॉम्बस्फोट मालिकेतले वैशिष्ट्य म्हणजे, कटवाल्यांनी बॉम्बस् प्रेशर कूकरमध्ये लपवून त्यांची स्फोटकता वाढवली. दि. 30 सप्टेंबर 2015 रोजी ‘मकोका’ न्यायालयाने पाच आरोपींना फाशी आणि सात आरोपींना जन्मठेप ठोठावली. या 2006 सालच्या स्फोटांचा, तसेच नोव्हेंबर 2008 साली 26/11 मधल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आझम चीमा हा मात्र कधीच कोणाच्या हाती लागला नाही. दि. 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी तो पाकिस्तानातच हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला, असे जाहीर करण्यात आले.

परवा दि. 21 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ‘मकोका’ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत सर्वच्या सर्व 12 आरोपींना निर्दोष म्हणून मुक्त केले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दि. 24 जुलै 2025 रोजी स्थागिती दिली आहे. दरम्यान सर्व आरोपींना तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. ते पुन्हा तुरुंगात जाणार नाहीत, हेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

आता दृश्य कसे दिसते पाहा. 2006 साली बॉम्बस्फोट होतात. किमान 200 लोक ठार आणि 800 लोक जखमी होतात. हा हल्ला भारताच्या भूमीवर झाल्यामुळे मनुष्यबळाशिवाय रेल्वे आणि इतर साधनसंपत्तीची हानी किती कोटी रुपयांची झाली, याची मोजदाद लागणे अशक्य! भारत हा हिंदूबहुल देश असल्यामुळे ठार आणि जखमी जवळजवळ सगळे हिंदूच! मालमत्तेचे नुकसान भारताचे आणि आरोपी सगळे मुसलमान. मुख्य आरोपी पाकिस्तानात फरार. 2006 सालच्या प्रकरणाचा खटला उभा राहायला 2015 उजाडते. निकाल झटपट लागतो; पण त्या निकालाला दिलेल्या आव्हानाची सुनावणी दहा वर्षे रेंगाळते आणि शेवटी निर्णय काय, तर 200 ठार आणि 800 जखमींच्या खटल्यातले सगळे निर्दोष! सत्यमेव जयते!!

आता इंग्लंडमधली कथा पाहा. हामित कोस्कन नावाचा 50 वर्षे वयाचा इसम इंग्लंडमध्ये राहतो. तो जन्माने तुर्कस्तानचा नागरिक आहे; पण वंशाने अर्धा कुर्द आणि अर्धा आर्मेनियन आहे. कुर्द लोक खूप मोठ्या संख्येने तुर्कस्तानात आणि तुर्कस्तान सीमेलगतच्या इराण, इराक, सीरिया, आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये राहतात. कुर्द लोक मुख्यतः सुन्नी आणि अल्प प्रमाणात शिया आहेत. पण, वर उल्लेख केलेल्या एकाही देशाला ते आपल्या भूमीत नको आहेत. कुर्द हे अरब नाहीत, म्हणून इराक आणि सीरिया या अरबी देशांना ते नको आहेत. इराकच्या सद्दाम हुसेनने तर हिटलरप्रमाणे विषारी वायूचा उपयोग करून कुर्द लोकांची वांशिक कत्तल उडवली होती. सध्या तुर्कस्तानचे रसीप एर्दोगान कुर्दांना भरडून काढत आहेत, तर हा हामित कोस्कन नावाचा इसम लंडनच्या तुर्कस्तानी वकिलातीसमोर गेला. त्याच्या एका हातात कुराण होते. ते त्याने पेटवून वर धरले आणि ‘इस्लाम हा दहशतवादी धर्म आहे,’ अशा घोषणा दिल्या. आपल्या जर लक्षात असेल, तर 2023 साली सलवान मोमिका नावाच्या इराकी निर्वासिताने स्वीडनमध्ये असेच कुराण जाळले होते. त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर खूप फिरली होती. या सलवान मोमिकाला दि. 29 जानेवारी 2025 रोजी गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर हामित कोस्कन याने फेब्रुवारी 2025 साली लंडनमध्ये केलेले हे कृत्य लक्षवेधी ठरले. ‘ब्लासफेमी’ म्हणजे ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ इंग्लंडने 2008 साली रद्द केलेला आहे. म्हणजेच धर्म, धर्मग्रंथ, देव, धर्मसंस्था याविषयी कोणीही मुक्तपणे आपला अभिप्राय व्यक्त करू शकतो. इंग्लंडच्या या मुक्त मतस्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. पोप महाशयांचे असे म्हणणे होते की, सर्व ख्रिश्चन देशांचा जसा मी धार्मिक नेता आहे, तसाच राजकीय नेताही आहे. पोपच्या या अधिसत्तेला 16व्या शतकात इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याने आव्हान दिले. त्याने पोपला इंग्लंडच्या धर्मकारण आणि राजकारण दोन्हींमधून हद्दपारच करून टाकले. पण, तो धर्माला मानत होता. म्हणून त्याने इंग्लंडसाठी ‘प्रोटेस्टंट अँग्लिकन चर्च’ ही स्वतंत्र धर्मसंस्था निर्माण केली. तिचा धर्मप्रमुख तो स्वतःच बनला. मात्र, राजाला राजकारण आणि धर्मकारण एकाच वेळी सांभाळणे शक्य नाही. तेव्हा राजाचा प्रतिनिधी म्हणून कँटरबरीचा आर्चबिशप अँग्लिकन चर्चचा कार्यकारी प्रमुख असेल, अशी व्यवस्था त्याने निर्माण केली.

परंतु, पुढच्या काळात एकंदर चर्च संस्था, देव, धर्म या सर्वांनाच आव्हान देणारे लोक इंग्लंडमध्ये निघाले. देव, धर्म, धार्मिक विचार यांची सार्वजनिक जीवनात, विशेषतः राजकारणात तर अजिबात लुडबुड नको. देव-धर्म ज्यांना करायचा असेल, त्यांनी तो चर्चेमध्ये किंवा वैयक्तिक जीवनात पाळावा. राजसत्ता आणि राजनेते धार्मिक प्रभावापासून पूर्ण अलिप्त-निधर्मी असले पाहिजेत, या अर्थाने ‘सेक्युलर’ हा शब्द 1851 साली जॉर्ज होलिओक या इंग्रज पत्रकार, संपादकाने सर्वप्रथम वापरला. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन चार्ल्स ब्रॅडलॉ याने 1866 साली इंग्लंडमध्ये ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’ स्थापन केली. ब्रॅडलॉ हा नास्तिक विचारवंत आणि राजकीय नेता होता. प्रसिद्ध महिला विचारवंत अ‍ॅनी बेझंट यादेखील काही काळ ब्रॅडलॉच्या सहकारी होत्या. धार्मिक संस्था म्हणजे ख्रिश्चन चर्चचे विविध पंथ, संप्रदाय धर्माच्या नावाखाली लोकांना मुक्तपणे विचार करायला नि ते विचार जाहीरपणे व्यक्त करायला मज्जाव करतात, याविरुद्घ त्यांचा हा लढा होता. तरीही प्रत्यक्षात ‘ईशनिंदा कायदा’ रद्द होण्यासाठी 2008 साल उजाडले. हा कायदा रद्द करून, लोकांना देव-धर्म याबाबत त्यांचे मत मांडायला, त्याप्रमाणे वागायला पूर्ण मोकळीक देताना कायदे मंडळासमोर अर्थातच चर्च आणि बायबल होते.

पण, आता हे 2025 आहे. हामित कोस्कन वरीलप्रमाणे कृती करत असताना जवळून जाणार्‍या एका ‘डिलिव्हरी बॉय’ने त्याला लाथ मारली, तर दुसर्‍या एकाने एक मोठा सुरा काढला आणि ‘ठारच मारतो बघ तुला’ असे म्हणत, तो त्याच्या अंगावर धावून गेला. प्रकरणाने गंभीर वळण घेण्यापूर्वी पोलीस आले. त्यांनी हामित कोस्कनला न्यायालयासमोर उभे केले. आता ईशनिंदा कायदा रद्द झाल्यामुळे सार्वजनिक जागी, इस्लाम हा दहशतवादी धर्म आहे, असे म्हणणे किंवा कुराण जाळणे हा गुन्हा नाही. मग पोलिसांनी त्याच्यावर आरोप ठेवला की, धार्मिक हेतूने प्रेरित होऊन याने सार्वजनिक ठिकाणची व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. हामित कोस्कनने न्यायाधीशांसमोर असा युक्तिवाद केला की, “माझा वाद कुणा व्यक्ती किंवा संस्थेशी नसून इस्लामशी आहे.” त्यावर न्यायमूर्ती जॉन मॅक्गरवा यांनी म्हटले की, “काही प्रमाणात तरी तुझी कृती मुसलमान व्यक्तींच्या द्वेषातून निर्माण झाली होती.” त्याला 240 पौंड दंड ठोठावताना न्यायालयाने असा शेरा मारला की, “आरोपीची गैरवागणूक ही एखाद्या माणसाला धोकादायक, त्रासदायक आणि वेदनादायक वाटू शकेल, अशी होती. त्याच्या वागणुकीमुळे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना आपला अवमान झाल्यासारखे वाटले.”

‘ख्रिश्चन कन्सर्न’ ही एक धार्मिक संस्था आहे. तिचा प्रवक्ता टिम दिएप हा या निकालाबाबत बोलताना म्हणाला, “म्हणजे तुम्ही बळी पडलेल्या माणसालाच दोषी ठरवताय. काही मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अपमान झाल्यासारखे वाटले आणि आता कदाचित ते हिंसक बनतील म्हणून तुम्ही त्यांनाच संरक्षण दिल्यासारखे आहे हे.” वर उल्लेख केलेल्या ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’चा प्रवक्ता स्टिफन इव्हान्स म्हणतो, “या निकालाने ईशनिंदा कायदाच पुन्हा येऊ घातला आहे, असे दिसते.”
हामित कोस्कन ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’च्या मदतीने वरिष्ठ न्यायालयात दाद मागणारच आहे; पण त्याने विचारलेल्या एका प्रश्नाला कुणाकडेही उत्तर नाही. “समजा, मी असेच वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे समोर उभे राहून बायबल जाळले असते, तर तुम्ही त्याला गुन्हा समजला असता का?” लय भारी पॉईंटचा मुद्दा आहे!
एनॉक-जो देवासह चालला बायबलच्या ‘जुना करार’ आणि ‘नवा करार’ या दोन्ही आवृत्त्यांमध्ये एनॉक नावाच्या माणसाचे वर्णन येते. हा एनॉक म्हणे देवाबरोबर चालत असे आणि तो सदेह स्वर्गात गेला.

हॉलंडमधल्या ग्रोनिंजेन विद्यापीठाला संशोधक म्लादेन पोपोव्हिक याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक अ‍ॅप तयार केले आहे. त्याचे नाव त्याने ‘एनॉक’ ठेवले आहे. हे अ‍ॅप हस्तलिखित कागदपत्रांचा अभ्यास करते. आपल्याला हे माहीतच आहे की, सन 1440 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग याने जर्मनीमध्ये छापखान्याचे तंत्र शोधून काढले. 1455 साली त्याने पहिले बायबलचे पुस्तक छापले. पण, या पूर्वी आणि नंतरसुद्धा छपाई तंत्र सर्रास होईपर्यंत, बायबल किंवा अन्य ख्रिश्चन धार्मिक साहित्य हाताने लिहिले जात होते. उत्तम हस्ताक्षर असलेल्या अनेकांचा अशा रीतीने पुस्तके लिहिण्याचा, त्यांच्या प्रती नकलण्याचा रीतसर व्यवसाय होता. आता प्रत्येक माणसाच्या हस्ताक्षरात थोडातरी फरक असतोच. पोपोव्हिकचे म्हणणे असे आहे की, “हस्ताक्षरात व्यक्तिगणिक फरक पडतो, तसा काळानुसार पण फरक पडतो.” म्हणजे समजा, ज्ञानेश्वरीची 700 वर्षांपूर्वीची एखादी हस्तलिखित पोथी आणि आज एखाद्या हौशी माणसाने हाताने लिहून काढलेली ज्ञानेश्वरी या जवळजवळ ठेवल्या, तर या अक्षरात व्यक्तीप्रमाणेच काळाचाही फरक पडेल. तो फरक सामान्य मानवी नजरेला समजणार नाही; पण ‘एनॉक’ला तो बरोबर समजेल.
तर म्लादेन पोपोव्हिकने हे अ‍ॅप ‘डेड सी स्क्रोल्स’ना लागू करून पाहिले. ‘डेड सी स्क्रोल्स’ ही पॅलेस्टाईनमधल्या मृत समुद्राच्या काठी, कामरान नामक टेकड्यांच्या गुंफामध्ये सापडलेली कागदपत्रे आहेत. भूर्जपत्रे आणि पपायरस कागदांवर लिहिलेली साधारण एक हजार कागदी गुंडाळ्यांमध्ये बायबलच्या जुन्या करारातील ‘डॅनियल’ आणि ‘अकिझियासिस्ट’ या प्रकरणांमधील काही भाग आरमाईक नि हिब्रू भाषांमध्ये लिहिलेला आहे. आज या कागदांमधला काही भाग फ्रान्समध्ये, तर बराच मोठा भाग इस्रायलमध्ये सुरक्षित ठेवलेला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही हस्तलिखिते ख्रिस्तपूर्व तिसरे शतक ते ख्रिस्तोत्तर दुसरे शतक या काळात लिहिली गेली आहेत.

म्लादेन पोपोव्हिकने ‘एआय’आधारित ‘एनॉक’ला ‘डेड सी स्क्रोल्स’चा काळ ठरवण्याची आज्ञा केली. ‘एनॉक’ने त्यांचा काळ ख्रिस्तपूर्व तिसरे शतक असा निश्चित केला. पोपोव्हिकला असा विश्वास आहे की, ‘एनॉक’द्वारे जगातल्या सर्वच भाषांमधील प्राचीन हस्तलिखितांचा काळ ठरवता येऊ शकेल.

मल्हार कृष्ण गोखले
Powered By Sangraha 9.0