मुंबई : राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो, असा पलटवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, २६ जुलै रोजी केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, मोदीजी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदीजी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी ‘गुब्बारा’ हा शब्द वापरताय, पण जनतेने निवडणुकीत १० वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला आहे," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे," असेही ते म्हणाले.
हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान!
"देशाच्या १४० कोटी जनतेने सलग तिसऱ्यांदा मोदीजींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणे म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे," अशी टीकाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर केली.