मुंबई : धनंजय मुंडे यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लिनचिट दिली आहे. अजून एका गोष्टीसंदर्भात त्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यात त्यांचा दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "धनंजय मुंडेंवर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यात न्यायालयाने त्यांना क्लिन चीट दिली आहे. त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही. परंतू, जी बदनामी व्हायची ती झाली. सगळीकडे बातम्या आल्या. आता त्यांच्यासंदर्भात अजून एक गोष्ट आहे. यामध्येसुद्धा पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे. त्यांना जो त्रास झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप सहन करावा लागला, तो भरून येऊ शकत नाही."
"कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लिनचिट दिली आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना दंडसुद्धा ठोठावला आहे. आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय आहे. अजून एका गोष्टीसंदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. त्याबाबत न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्या चौकशीनंतर पूर्ण वस्तुस्तिथी पुढे येईल. वस्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा?
विधानभवनात रमी खेळल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार, अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोकाटेंशी चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. अशातच धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.