पुणे : लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या पुरुषांकडून पैसे वसूल करणार असून गरज पडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. १४ हजार २९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "या महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्यावेळी ही योजना आणली त्यावेळी अतिशय चांगल्या भावनेने गरीब महिलांना सहकार्य करण्यासाठी आणली आहे. मधल्या काळात यात नोकरी करणाऱ्या काही लोकांचीसुद्धा नावे आली. जशा जशा गोष्टी लक्षात येतात तसे त्यांची नावं आम्ही कमी करत आहोत. पुरुषांची नावं येण्याचं काही कारणच नाही. जर पुरुषांची नावं आली असतील तर ही योजना पुरुषांकरिता नव्हती. त्यांना पैसे गेले असतील तर ते आम्ही वसूल करू. यात त्यांनी मदत केली नाही आणि लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन कुठल्या पुरुषाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
...तर त्यांना संधी दिली पाहिजे!
"कृषी क्षेत्रातील प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिनचिट दिली आहे. इतर बाबतीत न्यायालयाच्या चौकशीचा अहवाल आलेला नाही. उद्या जर हे सगळे अहवाल सकारात्मक आले तर आम्ही त्यांच्या मंत्रीपदाचा विचार करू, असे मी काल म्हणालो. एखाद्या व्यक्तीला कुणी जबाबादार धरले आणि चौकशीत ती व्यक्ती दोषी आढळली नाही तर त्यांना संधी दिली पाहिजे," असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.