बीड : बीड जिल्ह्यातील आरती बोकरे या तरुणीने आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पास होत मोठ यश प्राप्त केले आहे. परळीच्या भीमनगर परिसरात राहणाऱ्या आरतीच्या घरची परीस्थिती एकदम हलाखीची, वडील हमालकाम करतात, अशा परिस्थितीत तिने एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले.
कोणत्याही परीस्थितीत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचेच उदाहरण म्हणजे आरती बोकरे. एमपीएससी परीक्षेत आरतीला कमालीचं यश मिळालं असून ती आता अन्न सुरक्षा अधिकारी बनली आहे. २०२४ साली झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. निकाल जाहीर होताच अत्यंत गरीब कुटुंबातील आरतीच्या मेहतीचे चीज झाल्याने केवळ तिचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परळीतील नागरीकांना आंनद झाल्याचे दिसून आले.
आरतीचे वडील हे परळी शहरातील एका दुकानात हमाल म्हणून काम करतात, तर आई महावितरणमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करते. एमपीएससी परीक्षेत आरतीने मिळवलेले यश हे कोणत्याही क्लासशिवाय आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वत:च्या मेहनतीवर संपादित केलं आहे.