फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत!

25 Jul 2025 17:44:52

there-will-be-no-changes-in-fadnaviss-cabinet
 
मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार असल्याच्या अफवांना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा संजय राऊतांचा दावा फेटाळताना, असा कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल होणार नाही. कोअर ग्रुपच्या बैठकीत अशा कोणत्याही बदलाची चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळासंदर्भातील निर्णय हे राज्यस्तरावर नव्हे, तर केंद्रीय स्तरावर होतात. सध्या तरी असा कोणताही बदल होईल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.”
 
विधानसभा अध्यक्षपदाबाबतही सध्या कोणतेही बदल होणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. “विधानसभा अध्यक्षपदाबाबत मला सध्या काही माहिती नाही. पण माझ्या मते, सध्या असा कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. येत्या काळात नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका असल्याने स्थानिक नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही”, असेही त्यांनी नमूद केले.
 
पक्षाची इच्छा हीच माझी इच्छा – राहुल नार्वेकर
 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यावर भाष्य केले. “विधानसभा अध्यक्षपद बदलायचे की नाही, हा निर्णय पक्ष घेईल. पक्षाची इच्छा हीच माझी इच्छा असेल. अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा मोठे आहे. जर पद गेले तर आनंद कसा होईल? पण तुमच्या आशीर्वादाने नवीन जबाबदारी मिळाली, तर त्याचा नक्कीच आनंद होईल,” असे नार्वेकर यांनी सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जनतेच्या हिताचे निर्णय सरकार घेईलच,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
 
Powered By Sangraha 9.0