गणेशोत्सव काळात धावणार विशेष रेल्वे गाड्या - केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

25 Jul 2025 20:40:44

नवी दिल्ली,
भारतीय रेल्वेने गणेशोत्सव-२०२५ दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवर सेवा देणाऱ्या गणपती विशेष गाड्यांच्या थांब्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे , सावर्डा , अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या ठिकाणी या गाडयांना विशेष थांबे देण्यात आले आहेत.

नियमित रेल्वे सेवांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गर्दीच्या हंगामात आणि सण, विशेष कार्यक्रम इत्यादींमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने वाहतुक, कार्यान्वयन व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता इत्यादींच्या अधीन राहून रेल्वे विशेष गाड्या चालवते. विद्यमान सेवांमधील भार देखील अशा प्रकारे वाढवला जातो.

याशिवाय, सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी तसेच समाजविघातक घटकांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ०१ जुलै पासून रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना सुरुवातीच्या दिवशी पहिल्या तीस मिनिटांत वातानुकूलित (एसी) तसेच बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी तात्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी नाही. म्हणजेच, त्यांना एसी क्लासेससाठी सकाळी 10:00 ते 10:30 आणि बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी 11:00 ते 11:30 पर्यंत सुरुवातीच्या तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी नाही.
Powered By Sangraha 9.0