धुळे : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शुक्रवार, २५ जुलै रोजी धुळ्यात त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांची भेट घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मात्र, सर्वत्र माणिकराव कोकाटे यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच ते शुक्रवारी धुळे दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर उबाठा आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. तर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनही केले. यावेळी हॉटेलबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे यावेळी पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.