मुंबई : तेलंगणाच्या हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरात प्रशासनाने एका १०० वर्ष जून्या मंदिरावर बुलडोझर चालवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या रेवंत रेड्डी सरकारने हे ग्राम देवतेचे मंदिर पाडल्याच्या विरोधात निषेध करत असताना भाजप नेत्या माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपने दावा केला होता की, मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र होते.
मंदिर पाडल्याची बातमी पसरताच परिसरात तणाव वाढला. स्थानिक लोक आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शांततापूर्ण निदर्शने सुरू केली. या निदर्शनात भाजप नेत्या माधवी लता यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, 'मंदिर पाडून राज्य सरकारने कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. शांततेच निषेध करत असतानाही रेवंत रेड्डी सरकारच्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मंदिराची पुनर्बांधणी करावी आणि या कृत्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माधवी लता यांनी केली आहे.
कारवाईदरम्यान परिस्थितीत नियंत्रणात ठेवण्याकरीता मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेवरून भाजपने रेवंत रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि याला हिंदू धार्मिक स्थळांवरील हल्ला म्हटले आहे.