मुंबई : जपानचे रहिवासी ताकायुकी यांनी साधारण २० वर्षांपूर्वी उत्तराखंड येथे येऊन सन्यास घेतला होता. त्यानंतर त्यांनी बाला कुंभ मुनी म्हणून दीक्षा घेतली. लवकरच ते निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी धारण करतील. परदेशी लोकांना असलेली भारतीय परंपरा व संस्कृतीची ओढ तसेच त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास याचे बाला कुंभ मुनी हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
स्वामी बाला कुंभ मुनी नुकतेच चरण पादुका मंदिर हरिद्वार येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषद आणि मनसा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांचे आशीर्वाद घेतले. स्वामी बाला कुंभ मुनी जपानमध्ये सनातन धर्म संस्कृती आणि अध्यात्माच्या प्रसारासाठी योगदान देतील, असे रवींद्र पुरी यांनी यावेळी सांगितले.
अशी माहिती आहे की, स्वामी बाला कुंभ मुनी यांनी जपानमधील टोकियो येथील त्याचे घर मंदिरात रूपांतरित केले आहे. ते लवकरच उत्तराखंड येथे एक आश्रमही उभारणार आहेत. त्यांनी आजवर ३ हजारहून अधिक अनुयायी जोडलेले आहेत. मधल्या काळात ते उत्तर भारतातील कावड यात्रेतही सहभागी झाले होते. त्यांच्या सर्व अनुयायांनी त्यांच्यासोबत भगवान भोलेनाथांचा जलाभिषेकही केला होता. जपान हा बौद्ध धर्माचे पालन करणारा देश आहे, परंतु त्यांनी जपानमधील लोकांना सनातन धर्माबद्दल जागरूक केले. याशिवाय, त्यांनी भारत आणि जपानमधील मंदिरांच्या जीर्णोद्धारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.