नवी दिल्ली : (OTT Platforms Blocked) अश्लील, असभ्य आणि पोर्नोग्राफिक सदृश्य कंटेंट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या ॲप्सना तात्काळ ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे. इंटरनेट सेवा पुरवठादारांना (ISPs) सरकारी आदेशाची प्रत पाठवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारने दिला आहे.
सरकारी आदेशात काय म्हटले आहे?
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, "केंद्र सरकार बेकायदेशीर, अश्लील आणि आक्षेपार्ह डिजिटल कंटेंटच्या विरोधात आहे. सरकारने अशा कंटेंटची सेवा देणाऱ्या मोबाईल ॲप्सची यादी तयार केली आणि त्यांना ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला. असे २५ ॲप्स आणि वेबसाइट्स आहेत ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (आयटी कायदा २०००) आणि आयटी कायदा २०२१ (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) अंतर्गत २५ ॲप्सवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे."
सरकारी आदेशात असेही म्हटले आहे की, "२५ ॲप्स आणि वेबसाइट्सना आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि ६७अ, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९४ आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंध कायदा १९८६ च्या कलम ४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. जर कोणत्याही इंटरनेट सेवा प्रदात्याने सरकारी आदेशाचे उल्लंघन केले तर आयटी कायद्याच्या कलम ७९(१) अंतर्गत त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\