हनीट्रॅप प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांकडून विरोधकांची पोलखोल! थेट फोटो शेअर करत म्हणाले...

25 Jul 2025 12:18:40



मुंबई : हनीट्रॅप प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांचा संबंध जोडत विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यानंतर आता गिरीश महाजनांनी विरोधकांचेच फोटो शेअर करत त्यांची पोलखोल केली आहे. त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे फोटो शेअर केले आहेत.





मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "हनीट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक पुढे आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार, सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे असंख्य फोटो आहेत. आता या लोकांचे प्रफुल्ल लोढा सोबत काय संबंध आहेत?" असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, "त्यांचंच सरकार असताना मला नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठीच सर्वांनी या प्रफुल्ल लोढाला हाताशी धरलं होतं का?" असाही सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी अनेक फोटोही शेअर केले आहेत. खुद्द 'मोठे साहेब'शरद पवारांसोबत प्रफुल्ल लोढाची गहन चर्चा. जिथे संजय राऊत उभा राहतो तिथे उद्धव ठाकरे यांच्या अगदी शेजारी उभा असलेला, कोणीही मास्क लावलेला नसताना (ओळख लपवण्यासाठी) एकटाच मास्क लावून असलेला प्रफुल्ल लोढा. सुप्रिया सुळे ताईंसोबत खडसेंचा लाडका लोढा. शरदचंद्र पवार गटाचे गटाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष / कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याशी प्रफुल्ल लोढाची जवळीक, असे वेगवेगळे कॅप्शन देत त्यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.




Powered By Sangraha 9.0