नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोग बिहारनंतर आता देशभरातील मतदार यादी अद्ययावत (एसआयआर) करणार आहे. २४ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आयोग लवकरच संपूर्ण देशासाठी एसआयआरचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की मतदार यादी अचूक ठेवणे हे त्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे. त्यामुळे देशभरात एक विशेष मोहीम सुरू केली जाईल. आयोगाने २४ जून रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'मतदार यादीची अखंडता जपण्यासाठी आपल्या संवैधानिक आदेशाचे पालन करण्यासाठी आयोगाने आता देशभरात एक विशेष सघन सुधारणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, देशातील उर्वरित भागातील एसआयआरचे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केले जाईल. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून हे आवश्यक आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे.
बिहारमधील एसआयआरला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने गुरुवारी त्याचे महत्त्व स्पष्ट केले होते. आयोगाने म्हटले होते की, "भारताचे संविधान ही भारतीय लोकशाहीची जननी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन, संविधानाविरुद्ध जाऊन मृत मतदार, कायमचे स्थलांतरित मतदार, दोन ठिकाणी मते नोंदवलेले मतदार, बनावट मतदार किंवा परदेशी मतदार, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर संपूर्ण देशात बनावट मते टाकण्याचा मार्ग मोकळा करावा का, असा सवालही आयोगने केला आहे.