
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न प्रकारातील अॅप्सवर मोठी कारवाई करत उल्लू, एलटीटी, देसीफ्लिक्स यांसह अनेक अॅप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घातली आहे. ही कारवाई माहिती व प्रसारण मंत्रालयाने केली आहे.
या निर्णयानंतर इंटरनेट सेवा पुरवठादारांना विशेष निर्देश देण्यात आले असून त्यांनी भारतात या अॅप्स व संकेतस्थळांचा सार्वजनिक वापर थांबवावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच मंत्रालयाने अशाच स्वरूपाच्या आणखी २५ वेबसाइट्सची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे व डिजिटल मीडिया आचार संहिता नियम, २०२१ अंतर्गत, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गैरकायदेशीर माहिती हटवणे किंवा त्यावर बंदी आणणे ही मध्यस्थांची जबाबदारी आहे.
या अॅप्सवर अश्लील, लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री प्रसारित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, जी भारतीय कायदे व सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन करणारी असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. या कारवाईचा उद्देश समाजात अशा प्रकारच्या कंटेंटचा प्रसार रोखणे हा आहे.
यांच्यावर झाली कारवाई
बिग शॉट्स, बूमेक्स, नवरासा लाईट, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स.