नवी दिल्ली : (Ujjwal Nikam Oath Ceremony) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी गुरुवार दि. २४ जुलै रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने १३ जुलै रोजी दिली होती. दरम्यान गुरुवारी त्यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून उज्जवल निकम यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
या शपथविधीसाठी निकम यांचे संपूर्ण कुटुंब संसदेत उपस्थित होते. विशेष म्हणजे उपसभापती यांना आवर्जून सांगत उज्ज्वल निकम यांनी मराठी मधून देखील राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची शपथ घेतली. तसेच, भारताची सार्वभौमिकता आणि एकात्मता उन्नत राखण्याचे वचन दिले.
"मी राज्यसभेचा सदस्य..."
"मी, राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमिकता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडीन," असे निकम यांनी शपथ घेताना म्हटले. या शपथविधीमुळे आता राज्यसभेचे खासदार म्हणून उज्ज्वल निकम यांच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.