कंपनीतील कामाचे तास आणि एकूणच कार्यसंस्कृती हे अगदी लहान संस्थांपासून ते कॉर्पोरेट संस्थांपर्यंत कायमच चर्चेचे आणि चिंतेचे ठरलेले विषय. त्यात हल्लीच्या ‘जेन-झी’ची एकूणच कार्यशैली, मानसिक-भावनिक अस्थिरता, यामुळे कंपनी व्यवस्थापनासमोरही अनेकविध आव्हाने नव्याने उभी ठाकली आहेत. त्यानिमित्ताने या विषयाचा ऊहापोह करणारा हा लेख...
कंपन्यांतर्गत कर्मचार्यांच्या कामकाजाच्या संदर्भात त्यांचे कामाचे तास व कंपनीतील कामाची पद्धत दर्शविणारी कार्यसंस्कृती हे मुद्दे बरेचदा व विविध संदर्भात चर्चेला येत असतात. कधी काळी कामाचे तास आणि वैयक्तिक-पारिवारिक जीवनात समन्वय आणि संतुलन साधणे व आपल्या कामापोटी कंपनीसाठी प्रदीर्घ तास आणि वेळ काम करण्याचा काळ गेल्या काही वर्षांत माघारी पडला आहे. याउलट आता कंपन्यांच्या अपेक्षेनुरूप कर्मचार्यांनी कार्यालयातच नव्हे, तर घरूनसुद्धा अधिकाधिक काम करावे, अशी काही व्यवस्थापन-कंपन्यांची अपेक्षा दिसून येते. यामागे कर्मचार्यांना त्यांचे काम आणि त्यासाठीचे कामाचे तास याबाबत गृहीत धरण्यात आले असल्याची भावना विविध उद्योगांसह विशेषतः संगणक (आयटी) सेवा क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांमध्ये बळावली आहे. कामाच्या व कर्मचार्यांच्या कामकाजाच्या तासांच्या संदर्भातील ही स्थिती व मानसिकता ही कंपन्या आणि कर्मचारी या उभयतांच्या संदर्भात आव्हानात्मक व चिंताजनक ठरली आहे.
सद्यस्थितीत विशेषतः खासगी क्षेत्रातील व त्यातही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांकडून मर्यादित वेळेत अमर्यादित स्वरूपातील कामाची अपेक्षा केली जाते. यात विशेषतः नवे वा नव्याने काम करणारे कर्मचारी अधिकच भरडले जातात. व्यवस्थापक व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खासगी क्षेत्रात काम करणारा प्रत्येकजण व सर्वच कर्मचारी कायमस्वरूपी अस्थायी असतात. हे अलिखित तत्त्व अशा कर्मचार्यांसाठी विशेष तापदायी ठरते.
वाढत्या व्यावसायिक स्पर्धेचे व त्यातून निर्माण होणार्या ताणतणाव व नैराश्याचे लोण आता कंपनी व्यवस्थापन, व्यवस्थापक वा उच्च-पदस्थांपुरतेच मर्यादित न राहता, हे लोण आता सर्व स्तरांवरील व शेवटच्या टप्प्यातील कर्मचारी-कामगारांपर्यंत पोहोचले आहे, हे सद्यस्थितीत एक कटू वास्तव ठरते. गेल्यावर्षी ‘सीए’सारखे व्यवस्थापन क्षेत्र वा कायदा सल्लागार अथवा संगणकशास्त्र वा कॉल सेंटरमधील कर्मचारी असोत, यांपैकी काहीजणांनी कामाचे स्वरूप व त्यापोटी येणारा ताणतणाव यांमुळे आत्महत्येचा मार्ग चोखाळला होता. कामासाठी धडपडणार्यांकडून युवावस्थेत कामापोटी आत्महत्येसारखा आततायी व दुःखद मार्ग स्वीकारणे मोठे दुःखदायक ठरते.
यासंदर्भात ‘राष्ट्रीय गुन्हेगारी नोंदणी’ विभागातर्फे २०२२ सालचा तपशील व आकडेवारी यांच्याशी निगडित अहवाल सर्वांचेच डोळे उघडणारा ठरला आहे. या अहवालातील महत्त्वाचा व चिंतनीय भाग म्हणजे, २०२२ साली देशातील आत्महत्येच्या एकूण आकडेवारीतील दहा टक्के आत्महत्या करणारे हे पगारदार कर्मचारी-अधिकार्यांची संख्या होती. अशाच प्रकारची माहिती अन्य संबंधित सर्वेक्षणांद्वारा वेळोवेळी समोर येतच असते. या जीवघेण्या प्रकाराशी संबंधित ज्वलंत मुद्दा म्हणून ‘गॅलप’तर्फे जागतिक स्तरावरील कंपन्यामधील कामाचा प्रकार, कामाचे स्वरूप व कामकाज पद्धत यासंदर्भात नव्याने म्हणजे २०२४ साली केल्या गेलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. ‘गॅलप’च्या या जागतिक स्तरावरील कर्मचारी आणि त्यांचे काम यासंदर्भातील सर्वेक्षणानुसार आपल्यासाठी महत्त्वाची व तेवढीच चिंतनीय बाब म्हणजे, सद्यस्थितीत भारतातील कर्मचार्यांपैकी बहुसंख्य म्हणजेच तब्बल ८६ टक्के कर्मचारी हे आपले काम व कामाच्या ठिकाणी कामाच्या विलक्षण ताणतणावाखाली व संघर्षशील अवस्था व मानसिकतेत काम करीत आहेत.
आधी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये असह्य काम आणि जीवघेणे कामाचे तास हा प्रकार व कामाची पद्धत आता भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातच नव्हे, तर सेवा उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याकडे सर्वदूर पसरले आहे. याला प्रामुख्याने पाश्चात्य व विदेशी कंपन्यांतर्फे भारतीय कंपन्यांतर्फे विशेषतः संगणकीय सेवा क्षेत्रात काम करवून घेणे, हे मोठे व महत्त्वाचे कारण ठरले आहे. मुख्य म्हणजे, या नव्या कामकाज पद्धतीला बँकिंग, विमा क्षेत्रांसह शासन व शासकीय विभाग पण आता अपवाद म्हणून उरले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
व्यवस्थापन तज्ज्ञ व कर्मचार्यांचे कामकाज आणि त्यांची कामाच्या संदर्भातील व कामाच्या ठिकाणची मानसिकता यावर अभ्यास करणार्यांच्या मते, कर्मचार्यांच्या संदर्भात काम करताना ज्या प्रमुख गोष्टी त्यांना असह्य व यातनादायी होतात, त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक मिळणे, त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित कामकाज आणि कामाच्या पद्धतीत त्यांचा सहभाग नसणे वा त्यांच्याकडे दुर्लक्ष होणे, त्यांच्याकडून कायम दुय्यम दर्जाची वा प्रसंगी अनावश्यक वा अनैतिक कामे करवून घेणे, त्यांना कायम तणावग्रस्त स्थितीत काम करणे व त्यावर भर म्हणजे त्यांना अवमानजनक बोलणे, ऐकणे या आणि यांसारख्या मुद्द्यांचा व परिस्थितीचा समावेश असतो. याच विषयाशी निगडित उत्तर अमेरिकेतील कंपन्यांचे मुख्याधिकारी व वित्तीय प्रमुखांमध्ये करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झालेली बाब म्हणजे, त्याठिकाणी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८० टक्के उच्चाधिकार्यांनुसार, त्यांच्या कंपन्यांमधील कामकाज पद्धती व कार्यसंस्कृती कंपनी व कर्मचार्यांच्या कामकाजाला पूरक नाही. आपल्याकडील ‘गॅलप’द्वारा करण्यात आालेल्या व्यवस्थापकीय सर्वेक्षणामध्येसुद्धा नेमकी हीच बाब दिसून आली होती, ही बाब लक्षणीय आहे.
कर्मचार्यांच्या स्थिर व सकारात्मक विचार आणि मानसिकतेच्या संदर्भात विशेष उपक्रम राबविणार्या ‘एचसीएल वेलनेस’ कंपनीनुसार सद्यस्थितीत व्यवस्थापक म्हणून काम करणार्या अधिकार्यांपैकी ३६ टक्के अधिकारी-व्यवस्थापक हे कामाच्या संदर्भात अति व अनावश्यक काळजी व त्याच्याच जोडीला कमी पातळीवरील कामाबद्दचा गौरव या दोन्ही मुद्द्यांनी ग्रासलले आहेत. हीच बाब कर्मचारी स्तरावर पण दिसून येते. मोठ्या संख्येत व काही ठिकाणी तर बहुसंख्य कर्मचारी हे त्यांचे काम, कामाचा प्रकार, कामाचे तास व एकूणच कामकाज म्हणजेच कार्यसंस्कृती यासंदर्भात त्रस्त झालेले असतात. यालाच जोड मिळते ती कंपनी-कर्मचार्यांच्या दरम्यान असणार्या ढासळत्या परस्पर विश्वास व समज आणि आपलेपणाची. याचा परिणाम कर्मचार्यांची निवड करताना दिसून येतो. कर्मचारी यासंदर्भात अधिक चौकसच नव्हे, तर चोखंदळ झालेले स्पष्टपणे दिसते. कामाच्या ठिकाणी कमी असणार्या व ढासळणार्या विश्वासाचा मुद्दा प्रामुख्याने ‘राईट मॅनेजमेंट’ व ‘टकर इंटरनॅशनल’ यासारख्या भारतातील व्यवस्थापन कंपन्यांच्या अभ्यासामध्येसुद्धा दिसून आला आहे. कामाच्या संदर्भात व कामाच्या ठिकाणी कंपनी-कर्मचार्यांच्या दरम्यानच्या परस्पर विश्वासाच्या संदर्भात करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील अभ्यासानुसार अमेरिका, जपान, चीन, जर्मनी यांसारख्या निवडक १३ देशांच्या कार्यपद्धतीमध्ये भारताचा क्रमांक शेवटचा दिसून आला.
कामाचे तास आणि कंपनीअंतर्गत कार्यसंस्कृती यामुळे कर्मचार्यांचे सोडून जाण्याचे प्रमाण व टक्केवारी आजही सर्वाधिक असल्याचे नमूद करून ‘गॅलप’ व्यवस्थापन कंपनीने त्यावर अभ्यासपूर्ण व जळजळीत प्रकाश टाकला आहे. एवढेच नव्हे अशा प्रकारे कंपनी व नोकरी सोडून जाणार्या कर्मचार्यांच्या जागी नव्याची नेमणूक करताना व्यवस्थापनाला मोठा वेळ व आर्थिक भारही उचलावा लागतो, ही बाब साधार स्पष्ट केली आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६