मुंबई(Student sexual abuse by teacher): मुंबईतील एका नामांकित शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोक्सो(POCSO) अंतर्गत अटकेत असलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपी शिक्षिका मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत इंग्रजी शिकवत होती. तिच्यावर १७ वर्षीय विद्यार्थ्याशी एक वर्षांपासून संबंध असल्याचा आरोप आहे. तिने विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये नेऊन दारू पिण्यास भाग पाडले, असे पीडित विद्यार्थ्यांने तक्रारीमध्ये सांगितले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी नैराश्यात गेला, असा पालकांचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यावर शिक्षिकेने शाळा सोडला होती. त्यानंतर तिने विद्यार्थ्याशी पुन्हा संपर्क साधल्यामुळे पालकांनी पोलीस तक्रार दाखल केली.
या प्रकरणी तिच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून शिक्षिकेला २९ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने या प्रकरणात म्हटले की, “पीडित आणि आरोपी यांच्यातील संबंध सहमतीने होते आणि पीडित मुलगा १७ वर्षांहून अधिक वयाचा आहे. आरोपी शिक्षिकेने शाळा सोडली आहे, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्यातील संबंध राहिला नाही.” या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षिकेला तुरुंगात ठेवण्याचा फारसा उपयोग नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
या बाबतीत विद्यार्थ्याच्या वकिलांनी शिक्षिकेला जामीन नाकारावा अशी मागणी करत पुढील मुद्दे मांडले; विद्यार्थ्याला मानसिक त्रास झाला आहे. जामीन मिळाल्यास, शिक्षिका पुन्हा शोषण करू शकते आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकते.
यावर न्यायालयाने जामिनासाठी काही अटी घालत म्हटले की, “आरोपी शिक्षिका पीडित विद्यार्थ्याशी किंवा साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधणार नाही. ती कोणत्याही प्रकारची धमकी देणार नाही.या अटींचे उल्लंघन झाल्यास तिचा जामीन तात्काळ रद्द केला जाईल.” अशाप्रकारे न्यायालयाने या संवेदनशील घटनेवर जामीन देताना गुन्हेगार महिलेस सक्त ताकिद दिली.